(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SIP मध्ये गुंतवणूक करावी की FD करावी? दोन्ही पर्यायांमध्ये नेमके फायदे तोटे काय? जाणून घ्या?
Investment Idea :पैशांची गुंतवणूक करताना अनेकदा गुंतवणूकदारांमध्ये द्विधा मनस्थिती असते. एसआयपीमध्ये पैसे लावावे की मुदत ठेव यातील चांगला पर्याय कोणता?
मुंबई : एसआयपी की मुदत ठेव या दोन्हींपैकी कोणता पर्याय निवडावा यासंदर्भात गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम असतो. गुंतवणुकीचे अनेक पर्याय आता उपलब्ध आहेत. दोन्ही पर्यायांचा विचार केला असता नेमके काय फायदे आहेत अन् तोटे काय आहेत हे आजच्या स्टोरीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सिस्टिमेटीक इनवेस्टमेंट प्लॅन किंवा मुदत ठेव यांच्यामध्ये फायदेशीर कोणता हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
SIP चे फायदे काय?
एसआयपीद्वारे तुम्ही म्यूच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता येते. दरमहा एक ठराविक रक्कम नियमितपणे गुंतवणूक केली जाते. एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो. विशेषत: जेव्हा दीर्घकालीन गुंतवणूक करता तेव्हा परतावा मिळू शकतो. एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुरुवात 500 रुपयांपासून करता येऊ शकते.
एसआयपीचे नुकसान काय?
एसआयपीमधील परतावा हा पूर्णपणे शेअर बाजारावर अवलंबून असतो. जर, शेअर बाजारात घसरण झाली तर तुमच्या गुंतवणुकीचं मूल्य कमी होतं. कमी काळात अधिक परतावा मिळवायचा असल्यास एसआयपीमधून अधिक परतावा मिळत नाही.
मुदत ठेवीचे फायदे
मुदत ठेव हा पर्याय गुंतवणुकीचा पारंपारिक पर्याय मानला जातो. तुम्ही एक ठराविक रक्कम बँकेत जमा करता. त्यावर तुम्हाला निश्चित दरानं व्याज मिळतं. मुदत ठेव ही जोखीम मुक्त गुंतवणूक मानली जाते. एसआयपीप्रमाणं बाजारातील चढ उताराचा प्रभाव मुदत ठेवीवर होत नाही. मुदत ठेवीत मिळणारा परतावा बदलत नाही. मुदत ठेवीचा कालावधी गुंतवणूकदार निश्चित करु शकतो. मुदत ठेवीत काही महिन्यांपासून वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते.
मुदत ठेव पर्यायाचा तोटा काय?
मुदत ठेवीमध्ये रक्कम केल्यास गुंतवणूकदारांना मिळणारा मर्यादित परतावा ही बाब अनेकदा दुसर्या पर्यायांचा विचार करण्यास कारणीभूत असते. शेअर बाजार किंवा इतर गुंतवणुकीच्या योजनांपेक्षा मुदत ठेवीमधील गुंतवणुकीतून मिळणारा परतावा कमी असतो. एफडीमध्ये चक्रवाढ पद्धतीनं व्याज कमी प्रमाणात मिळतं. जेव्हा तुम्ही मासिक किंवा वार्षिक अशा पद्धतीनं हिशोब करता त्यावेळी मुदत ठेवीतून कमी परतावा मिळत असल्याचं समजतं. एफडीमध्ये गुंतवलेली रक्कम मुदत पूर्ण होण्यापूर्वी काढल्यास दंड द्यावा लागतो. एसआयपीमध्ये दंड द्यावा लागत नाही.
एसआयपी किंवा एफडी यामध्ये गुंतवणूक करताना कोणत्या पर्यायाची निवड करावी याचा विचार गुंतवणूकदारांना करावा लागणार आहे.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)