(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आणि शेअर बाजाराचा संबंध काय? जाणून घ्या 20 वर्षांचा इतिहास
येत्या 4 जून रोजीलोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. निकाल काय लागणार? यावरून शेअर बाजाराची स्थिती अवलंबून असणार आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) अंतिम टप्प्यातील मतदान 1 जून रोजी पार पडले. गेल्या दीड महिन्यांपासून निवडणुकीची ही रणधुमाळी चालू होती. आता देशातील सर्वच राजकीय पक्ष, देश, तसेच उमेदवारांना निकालाच प्रतीक्षा आहे. 4 जून रोजी मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होईल. दरम्यान, देशाच्या राजकारणात या घडामोडी घडताना भारतात शेअर बाजारावरदेखील (Share Market) मोठे परिणाम होणार आहे. कोणाची सत्ता येणार? देशाला स्थिर सरकार लाभणार का? या प्रश्नाच्या उत्तरानुसारच 4 जून रोजी शेअर बाजारात घडामोडी घडणार आहेत.
निवडणूक, शेअर मार्केट यांचा संबंध काय?
4 रोजी संपूर्ण गुंतवणूकदारांचे निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष असेल. लोकसभेच्या निकालानुसारच शेअर बाजारात घडामोडी घडत असतात. 2004 सालच्या लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा वेगळा निकाल लागला होता. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वातील एनडीए सरकार पुन्हा एकदा सत्तेत येईल, असा अंदाज लावला जात होता. पण निकाल मात्र वेगळा आला. त्यामुळेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 12.24 अंकांनी घसरला होता. या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय शेअर बाजार 8.3 टक्क्यांनी उसळला. त्यानंतर पुढच्या पाच दिवसांत निफ्टीमध्ये 16 टक्क्यांची वाढ झाली होती.
2009 मध्ये काय घडलं होतं?
2009 सालच्या निवडणुकीत निफ्टीमध्ये तब्बल 17.74 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली होती. निकालाच्या दुसऱ्या दिवशी निफ्टीमध्ये 0.11 टक्क्यांची घसरण झाली होती. निवडणूक निकालाच्या 5 दिवसांनंतर हा निर्देशांक 2 टक्क्यांनी गडगडला होता.
2014 साली काय झालं होतं?
या निवडणुकीत भाजपचा विजय झाला आणि नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. या निकालानंतर निफ्टीमध्ये 1.12 टक्क्यांनी वाढ झाली होती. दुसऱ्या दिवशी निफ्टीमध्ये दिवशी 0.84 टक्क्यांनी तर 5 दिवसांत 2.28 टक्क्यांनी तेजी आली होती.
2019 साली नेमकं काय घडलं होतं?
2019 साली लोकसभा निवडणुकीच्या निकालात पुन्हा एकदा मोदींचा विजय झाला. त्यामुळे या निकालाच्या दिवशी निफ्टीमध्ये 0.69 अंकांची घसरण झाली. दुसऱ्या दिवशी हा निर्देशांक 1.6 टक्क्यांनी वधारला. त्यानंतर पुढच्या 5 दिवसांत निर्देशांकात 2.48 टक्क्यांनी वाढ झाली होती.
हेही वाचा :
गौतम अदाणींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे; बनले भारत, आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती!