गौतम अदाणींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे; बनले भारत, आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती!
जगातील श्रीमंतांच्या यादीत अदाणी उद्योग समुहाचे प्रमुख गौतम अदाणी हे एक पाऊल पुढे गेले आहेत. ते आता आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
मुंबई : अदाणी उद्योग समुहाचे मालक गौतम अदाणी (Gautam Adani) यांनी यशाचे नवे शिखर गाठले आहे. ते आता आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. याआधी हा मान मुकेश अंबानी यांना होता. मात्र आता श्रीमंतीच्या बाबतीत गौतम अदाणी यांनी मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे. त्यामुळे आता अदाणी भारतातील तसेच आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार शनिवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत गौतम अदाणी यांची संपत्ती 111 अब्ज डॉलरर्सपर्यंत पोहोचली. गौतम अदाणी जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 11व्या स्थानावर पोहोचले आहेत. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही 109 अब्ज डॉलर्स आहे.
शेअर्समध्ये तेजी आल्यानंतर अदाणी यांची संपत्ती वाढली
गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडल्या. याच आठवड्यात अदाणी उद्योग समुहाच्या शेअर्सचे मूल्य वाढल्याचे पाहायला मिळाले. परिणामी अदाणी यांच्या एकूण संपत्तीत चांगलीच वाढ झाली. जेफरीज या इन्व्हेस्टमेंट बँकिंक कंपनीने अदाणी उद्योग समुहाच्या काही शेअर्सचा अभ्यास केला. लवकरच अदाणी समुहाच्या काही शेअर्समध्ये तेजी येऊ शकते, असा अंदाज जेफरीजने व्यक्त केला होता. अदाणींच्या कंपन्यांत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संपत्ती शुक्रवारी (31 मे) 1.23 लाख कोटी रुपयांनी वाढली होती.
बर्नार्ड अर्नाल्ट - जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती
ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार सध्या बर्नार्ड अर्नाल्ट हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून समोर आले आहेत. सध्या त्यांची एकूण संपत्ती 207 अब्ज डॉलर्स झाली आहे. अर्नाल्ट यांच्यानंतर टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क यांचा क्रमांक आहे. त्यानंतर जेफ बेझोस हे जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मस्क यांची एकूण संपत्ती 203 अब्ज डॉलर्स तर बेझोस यांची संपत्ती 199 अब्ज डॉलर्स आहे.
कोणाकडे किती संपत्ती, जाणून घ्या यादी
बर्नार्ड अर्नाल्ट - 207 अब्ज डॉलर्स
एलॉन मस्क - 203 अब्ज डॉलर्स
जेफ बेझोस - 199 अब्ज डॉलर्स
मार्क झुकरबर्ग - 166 अब्ज डॉलर्स
लॅरी पेज - 153 अब्ज डॉलर्स
बिल गेट्स - 152 अब्ज डॉलर्स
सर्गेई ब्रिन - 145 अब्ज डॉलर्स
स्टीव बाल्मर - 144 अब्ज डॉलर्स
वॉरेन बफेट - 137 अब्ज डॉलर्स
लऍरी एलिसन - 132 अब्ज डॉलर्स
हेही वाचा :
पैसे ठेवा रेडी! 'हे' तीन आयपीओ तुम्हाला करू शकतात मालामाल!
पैसे ठेवा रेडी! 'हे' तीन आयपीओ तुम्हाला करू शकतात मालामाल!