(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शेअर बाजारावर 'हा' शेअर सुस्साट! एका वर्षात दुप्पट रिटर्न्स; खरेदी करण्यासाठी झुंबड!
टिटागड रेल सिस्टिम्स लिमिटेड ही कंपनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. त्यामुळे ब्रोकरेज कंपन्यांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
मुंबई : शेअर बाजारात असे काही स्टॉक्स असतात जे शांतीत क्रांती करून जातात. रेल्वे क्षेत्रातील टिटागड रेल सिस्टिम्स लिमिटेड (Titagarh Rail Systems Ltd) या कंपनीच्या शेअरचीही स्थितीही अशीच काहीशी आहे. आज (7 मे) शेअर बाजार चालू असताना या शेअरने गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत. या कंपनीचा शेअर आगामी काळात चांगली कामगिरी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे अनेक ब्रोकरेज संस्थांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच शेअर खरेदी केल्यानंतर वेगवेगळे टार्गेट्स दिले आहेत.
आज गुंतवणूकदारांना मिळाले चांगले रिटर्न्स
ब्रोकरेज हाउस मॉर्गन स्टॅनले (Morgan Stanley) च्या मतानुसार हा शेअर आगामी काळात चांगली कामगिरी करणार आहे. आज शेअर बाजार चालू झाला तेव्हा या कंपनीच्या शेअरचा आलेख चढाच होता. सुरुवातीलाचा या कंपनीच्या शेअरचे मूल्य 1068.85 रुपयांवर पोहोचले होतो. त्यानंतर हा भाव 8.70 टक्क्यांनी वाढून थेट 1124.10 रुपयांपर्यंत पोहोचला होता. भांडवली बाजार बंद झाला तेव्हा या शेअरचे मूल्य 1083.30 रुपये होते. म्हणजेच दिवसभरात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना साधारण 4.75 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.
तज्ज्ञ काय सांगत आहेत?
सीएनबीसी टीव्ही 18 रिपोर्टच्या मते ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलेने या कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला असून टार्गेट प्राईस 1285 रुपये ठेवण्यास सांगितले आहे. मॉर्गन स्टॅनलेने सांगितलेले टार्गेट हे कंपनीच्या शेअरच्या सध्याच्या मूल्याच्या 24 टक्के अधिक आहे. मॉर्गन स्टॅनले याव्यतिरिक्त आशिका स्टॉक ब्रोकिंगनेही या कंपनीच्या शेअरवर 1350 रुपये तर नुवामाने 1309 रुपये टार्गेट प्राईस ठेवण्यास सांगितले आहे.
एका वर्षात पैसे डबल
trendlyne च्या डेटानुसार या कंपनीने केल्या काही महिन्यांत चांगला परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्समध्ये 36.90 टक्क्यांनी तेजी पाहायला मिळालेली आहे. तर साधारण वर्षभरात या कंपनीने गुंतवणूकदारांना 215.50 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. मुंबई शेअर बाजारावर या कंपनीच्या शेअरचे 52 आठवड्यातील सर्वोच्च मूल्य 1249 रुपये तर 52 आढवड्यातील सर्वांत कमी मूल्य 321 रुपये प्रति शेअर आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 14,608.74 कोटी रुपये आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
सावधान! बँकेच्या 'या' नव्या नियमाकडे करू नका कानाडोळा, अन्यथा तुमचे बँक खाते थेट होईल बंद!
24 कॅरेट की 22 कॅरेट? नेमकं कोणतं सोनं सर्वांत चांगलं? दागिने नेमके कशाचे करावेत?