(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market : शेअर बाजाराचा Sensex 70 हजारांच्या पार, SIP आणि म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूकदारांची रूची
Stock Market Updates : गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत भारतीय शेअर बाजार 60 हजारांहून 70 हजारांवर पोहोचला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाल्याचं दिसून येतंय.
मुंबई: भारतीय शेअर बाजाराचा (Share Market) सेन्सेक्स (Sensex) निर्देशांकानं 70 हजारांचा टप्पा गाठलाय. तर तिकडे निफ्टीनं देखील 21 हजारांचा टप्पा गाठल्याचं दिसलं. मागील काही वर्षात भांडवली बाजारात गुंतवणूक वाढताना दिसते आहे. छोटे गुंतवणूकदार देखील याला अपवाद नाहीत.
मागील अनेक वर्षात या बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) या दोन इमारतींनी गुंतवणूकदारांच्या आणि कंपन्यांच्या पदरात भरभरून टाकलंय. भांडवली बाजारात मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गुंतवणुकीमुळे सर्वसामान्यांसोबतच कंपन्यांना देखील फायदा झालाय. भांडवली बाजारातून कंपन्या पैसा उभा करण्याचा प्रयत्न करतात आणि तशातच सेन्सेक्स निर्देशांक पहिल्यांदाच 70 हजार पार जात ऑल टाईम हाय गेला आहे. मात्र, 60 हजार ते 70 हजारपर्यंतचा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी सेन्सेक्सला दीड वर्ष लागली आहेत.
कसा होता प्रवास? (Stock Market Updates)
- 7 फेब्रुवारी 2006 ते 11 डिसेंबर 2007 पर्यंत 10 हजार ते 20 हजार जाण्यापर्यंत 463 दिवस लागले.
- 40 ते 50 हजारांचा टप्पा गाठण्यासाठी सेन्सेक्सला 416 दिवस लागले.
- कोव्हिड येताच निर्देशांक वेगानं वर जाण्याचा सिलसिला देखील दिसला.
- 50 ते 60 हजारांपर्यंत सर्वात वेगवान 10 हजार अंक सहा महिन्यांच्याही कमी वेळात वधारला होता.
- 24 सप्टेंबर 2021 रोजी इंडेक्स 60 हजार 48 अंकांवर पोहोचला होता
एसआयपी, म्युचुअल फंडसारख्या गुंतवणुकीत छोट्या भांडवलदारांनी रूची वाढायला लागल्याचं दिसून येतंय. अशात गुंतवणूकदार देखील तिकडे आकर्षित होताना दिसतोय. मागील दोन वर्षात म्युच्युअल फंडमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक दिसते आहे. ज्याचा फायदा देखील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना होतोय.
युक्रेन-रशिया युद्ध, जागतिक स्तरावर कोव्हिडमुळे आलेली आर्थिक मंदी आणि सध्या सुरू असलेले हमास-इस्त्रालय युद्धाचे परिणाम भांडवली बाजारावर दिसले. त्याचा परिणाम त्या क्षणीदेखील झाला. मात्र भारताचा आर्थिक विकास दर, जीएसटीच्या चांगल्या आकड्यांमुळे त्याचे सकारात्मक परिणाम देखील भांडवली बाजारावर दिसले आहेत. त्यामुळे येत्या काळात यात आणखी भर पडेल यात शंका नाही.
मार्केट कॅप पुन्हा 350 लाख कोटी रुपयांच्या पुढे
बाजारातील तेजीमुळे बीएसईवर सूचीबद्ध समभागांच्या मार्केट कॅपमध्ये (Market Cap) वाढ झाली आहे. आजच्या व्यापारात, बीएसईचे मार्केट कॅप 351.11 लाख कोटी रुपये झाले आहे, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 349.36 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यापारात मार्केट कॅपमध्ये 1.75 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
ही बातमी वाचा: