Share Market Opening : पतधोरण जाहीर होण्याआधी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स-निफ्टी वधारले
Share Market Opening : आरबीआयकडून पतधोरण जाहीर होण्याआधी शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे.
Share Market Opening : रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर होण्यापूर्वी शेअर बाजारात तेजी (Share Market Opening Bell) दिसून येत आहे. जागतिक शेअर बाजारात संमिश्र संकेत असून आशियाई बाजारातूनही भारतीय शेअर बाजारासाठी फारसे चांगले संकेत दिसत नाहीत. मात्र, भारतीय शेअर बाजारात सुरुवातीच्या टप्प्यात खरेदी असल्याचे दिसत आहे.
आज सकाळी बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स 122.24 अंकांनी वधारत 58,421.04 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांकात 41.65 अंकांची वाढ झाली. निफ्टी 17,423.65 अंकांवर व्यवहार करत होता. सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 229 अंकांनी वधारत 58,528.76 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी निर्देशांक 53 अंकांनी वधारत 17,435.20 अंकांवर व्यवहार करत होता.
आज बाजारातील व्यवहारांना सुरुवात झाल्यानंतरच्या पहिल्या 10 मिनिटात निफ्टी 17400 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी 50 मधील 33 शेअरमध्ये तेजी दिसून आली. त्याशिवाय, इतर 17 शेअरमध्ये घसरण दिसून आली. बँक निफ्टीत सध्या 108 अंकांची उसळण दिसत असून 37863 अंकांवर व्यवहार करत आहे.
आज सेन्सेक्समधील 30 पैकी 24 शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. तर, सहा शेअरमध्ये घसरण सुरू आहे. अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल, एल अॅण्ड टी, एसबीआय, विप्रो, एचयूएल, डॉ. रेड्डीज, आयसीआयसीआय बँक, टायटन, टाटा स्टील, एशियन पेंट्स, इन्फोसिस आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रामध्ये तेजी दिसून येत आहे.
आरबीआय आज पतधोरण जाहीर करणार
आज आरबीआयचं पतधोरण जाहीर होणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (shaktikant Das) पतधोरण जाहीर करतील. रेपो दरात 35 ते 50 बेसिस पॉइंट्सची वाढ जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्ज महाग होऊ शकतात. आरबीआयकडून 0.50 टक्के व्याजदर वाढवण्याचा अंदाज आहे. पतधोरण जाहीर करताना महागाईवर नियंत्रण मिळवण्याच्या आव्हानासोबतच भारताला मंदीच्या छायेत न जाऊ देण्याचं देखील आव्हान असणार आहे.