(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Opening Bell: शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; सेन्सेक्स, निफ्टीत घसरण
Share Market Opening Bell: शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली. बाजारात आज अस्थिरता राहण्याची शक्यता आहे.
Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली. अमेरिकन शेअर बाजारात झालेली पडझड आणि रिझर्व्ह बँकेकडून आज जाहीर करण्यात येणाऱ्या पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात आज अस्थिरता दिसून येण्याची शक्यता आहे. अमेरिकन शेअर बाजार आणि आशियाई बाजारातही पडझड कायम राहिली.
आज सकाळी बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्स (Sensex) 169 अंकांच्या घसरणीसह 56,240.15 अंकांवर खुला झाला. निफ्टी (Nifty) 16,798.05 अंकांवर खुला झाला होता. त्यानंतर काही वेळेसाठी सेन्सेक्स सावरत किंचित वधारला होता. त्यानंतर पुन्हा निर्देशांक 250 अंकांपर्यंत घसरला होता. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 178 अंकांच्या घसरणीसह 56,231.00 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 33 अंकांच्या घसरणीसह 16,784.90 अंकांवर व्यवहार करत होता.
शेअर बाजारात प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 211 अंकांनी घसरून 56198 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 53 अंकांच्या घसरणीसह 16764 अंकांवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्समधील 30 पैकी 16 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर , 14 शेअर्स घसरले होते. त्याशिवाय, निफ्टीतील 50 पैकी 25 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसली. तर, उर्वरित 24 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. एका शेअर्समध्ये बदल झाला नाही.
सेक्टोरिअल इंडेक्स पाहिले तर आयटी सेक्टरमध्ये 1.17 टक्के आणि वित्तीय क्षेत्रात 0.58 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक, ऑटो, एफएमसीजी, रियल्टी, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये घसरण दिसून आली. तर, हेल्थकेअर, मीडिया, मेटल आणि फार्माच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे.
गुरुवारी बाजारात घसरण
गुरुवारी शेअर बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्समध्ये 188 अंकांची आणि निफ्टीत 40 अंकांची घसरण नोंदवण्यात आली. सेन्सेक्स 56,409 अंकांवर, तर निफ्टी16,818 अंकांवर स्थिरावला होता. गुरुवारी 1775 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1435 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. 102 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या: