Share Market Opening : शेअर बाजारात पुन्हा विक्रीचा जोर; सेन्सेक्स 198 अंकांनी घसरला
Share Market Opening : आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली.
Share Market Opening : आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजाराची (Share Market Opening Bell) घसरणीसह सुरुवात झाली. मागील आठवड्यात शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसला होता. आज, मात्र विक्रीचा दबाव असल्याने बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स 177 अंकांच्या घसरणीसह 55,895 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टीमध्ये 43 अंकांची घसरण होत 16,662 च्या पातळीवर व्यवहाराची सुरुवात झाली. त्यानंतर बाजारातील घसरण वाढत गेली.
आज जवळपास सर्वच सेक्टरमध्ये घसरण असल्याचे चित्र आहे. ऑटो, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी आदी सेक्टरमध्ये विक्रीचा जोर आहे. तर, बँकिंग, आयटी, मेटल्स सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसत आहे. स्मॉल कॅपमध्ये विक्रीचा जोर दिसत आहे. तर, मिड कॅपमध्ये किंचीत खरेदी दिसून येत आहे.
निफ्टी 50 मधील 29 शेअरमध्ये घसरण सुरू आहे. तर, 21 शेअर वधारले आहेत. सेन्सेक्समधील 30 शेअरपैकी 13 शेअर वधारले असून 17 शेअर्स घसरले आहेत. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास 343 अंकांच्या घसरणी सेन्सेक्स 55,728.31 अंकांवर व्यवहार करत आहे. तर, निफ्टी 91 अंकांच्या घसरणीसह 16,628.40 अंकांवर व्यवहार होत आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात 1.14 टक्क्यांची तेजी दिसत आहे. त्याशिवाय, इंडसइंड बँक 0.98 टक्के, टाटा स्टील 0.79 टक्के, भारती एअरटेल 0.66 टक्के, अॅक्सिस बँक 0.63 टक्के, कोटक महिंद्रा 0.59 टक्के, विप्रो 0.51 टक्के, बजाज फायनान्स 0.38 टक्क्यांनी वधारले आहेत.
तर, रिलायन्सच्या शेअर दरात 3.52 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. त्याशिवाय अल्ट्राटेक सिमेंटमध्ये 0.91 टक्के, नेस्ले 0.90 टक्के, सन फार्मा 0.87 टक्के, एचडीएफसी 0.85 टक्के, टेक महिंद्रा 0.76 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.
शुक्रवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये 391 अंकांनी आणि निफ्टीमध्ये 114 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 56,072 अंकावर तर, निफ्टी 16,719 अंकांवर स्थिरावला होता.
शुक्रवारी शेअर बाजार बंद होताना 1732 कंपन्यांच्या शेअर्स दरात वाढ झाली. तर 1511 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. 143 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.