Share Market Opening Bell: शेअर बाजारात विक्रीचा दबाव; सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांकात घसरण
Share Market Opening Bell: शेअर बाजारात विक्रीचा दबाव दिसत असून सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांची घसरणीसह सुरुवात झाली आहे.
Share Market Opening Bell: शेअर बाजारात आजची सुरुवात घसरणीसह झाली. सकाळी प्री-ओपनिंग सत्रानंतर सेन्सेक्स (Sensex) निर्देशांक वधारला. मात्र, त्यानंतर मोठी घसरण दिसून आली. बाजारात आजही विक्रीचा दबाव असल्याचे संकेत आहेत. शुक्रवारी, अमेरिकन शेअर बाजारात घसरण दिसून आली होती. जागतिक शेअर बाजारातही अस्थिरता दिसून आली होती.
जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट दिसत आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येत आहे. आज सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 57,752.50 अंकावर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी निर्देशांक 17,144.80 अंकावर खुला झाला. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 200 अंकांच्या घसरणीसह 57,719.80 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 74 अंकांच्या घसरणीवर 17,111.50 अंकांवर व्यवहार करत होता.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांक 288 अंकांच्या घसरणीसह 57631 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 91.25 अंकांच्या घसरणीसह 17094 अंकांवर व्यवहार करत होता.
सकाळी बाजार सुरू झाल्यानंतर निफ्टीतील 50 पैकी 11 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसली. तर, 39 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. अॅक्सिस बँक, बजाज ऑटो, इंडसइंड बँक, इन्फोसिस आणि अदानी पोर्ट आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, टाटा स्टील, ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, जेएसडब्लू स्टील आणि अपोलो रुग्णालयाच्या शेअर दरात घसरण दिसून आली.
ऑटो, आयटी, मीडिया, मेटल, फार्मा, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑईल अॅण्ड गॅस, रियल्टी आदी सेक्टरमध्ये विक्रीचा जोर दिसत आहे. बँकिंग शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे.
'शेअर इंडिया'चे उपाध्यक्ष आणि संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. रवी सिंह यांनी सांगितले की, निफ्टी 17050-17100 अंकांदरम्यान सुरू झाल्याने आज बाजार 16900-17200 या दरम्यान व्यवहार करण्याचा अंदाज आहे. बँक, आयटी, फार्मा, पीएसयू बँक आणि वित्तीय सेवांच्या स्टॉक्समध्ये तेजी दिसण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय, एनर्जी, रियल्टी, मीडिया, ऑटो आणि मेटल शेअर दरात विक्री होण्याची शक्यता आहे.
परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा
परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून (FPIs) विक्रीचा सपाटा सुरू आहे. या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात शेअर बाजारातून सुमारे 7,500 कोटी रुपये त्यांनी काढले आहेत. त्यातच आता वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह आणि इतर देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून व्याज दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: