Share Market Updates : गुंतवणूकदारांच्या 9 लाख कोटींचा चुराडा; शेअर बाजार का घसरला?
Stock Market : तेजीसह सुरू झालेला शेअर बाजारात आज दिवसखेर घसरणीसह बंद झाला. आज गुंतवणूकदारांच्या 9 लाख कोटींचा चुराडा झाला.
Share Market : बुधवारी काही तासांच्या कालावधीत शेअर बाजारात (Share Market) विक्रमी वाढ आणि विक्रमी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स (Sensex) -निफ्टीने (Nifty) सार्वकालिक उच्चांक गाठल्यानंतर मोठी घसरण झाली. या मोठ्या घसरणीसाठी दीर्घ काळानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत (Coronavirus Updates) झालेली मोठी वाढ असल्याचे म्हटले जात आहे. मागील 24 तासांत कोविड-19 च्या 614 नवीन रुग्णांनी केवळ प्रशासनाचीच नव्हे तर शेअर बाजाराचीही चिंता वाढवली आहे. तर, त्याचवेळी परदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याने बाजारात घसरण झाली. बुधवारी शेअर बाजारात झालेल्या घसरणीने गुंतवणूकदारांचे 9.1 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
20 डिसेंबर रोजी, सेन्सेक्स निर्देशांक 931 अंकांनी घसरून 70,506 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 303 अंकांनी घसरून 21,150 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 30 समभाग घसरले, तर ऑटो, मेटल, बँक निफ्टी आणि सेवांसह जवळपास सर्वच क्षेत्रांत विक्रीचा जोर दिसून आला. या मोठ्या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजाराचे बाजार भांडवल 9.1 लाख कोटींनी घसरले. मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी 3,178 कंपन्यांचे शेअर्स घसरले. तर, 657 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली.
परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा
24 तासांत, कोरोना बाधितांची 614 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. तर, दुसरीकडे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 600 कोटींहून अधिक रक्कम काढून घेतली. त्यामुळे शेअर्समध्ये वेगाने नफा वसुली सुरू झाली. तर देशांतर्गत संस्थांनी सुमारे 294 कोटी रुपयांची खरेदी केली. याशिवाय बँका, मेटल्स आणि वाहन समभागांमध्ये सर्वाधिक घसरण झाल्याने शेअर बाजार दबावाखाली आला.
शेअर बाजारात घसरण का झाली?
कोरोनाबाधितांची 600 हून अधिक रुग्णांची नोंद होणे, परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली नफावसुली करत 600 कोटी रुपये बाजारातून काढले. त्याशिवाय, बँक, मेटल आणि ऑटो सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर नफा वसुली झाली. मागील काही दिवसांत बाजारात तेजी दिसून आली. त्यामुळे नफावसुली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर आज बाजारात मोठी नफावसुली झाली.
(Disclaimer : शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )