Share Market Updates : शेअर बाजारात विक्रीच्या सपाट्याने पडझड; सेन्सेक्स 900 अंकांनी घसरला
Share Market Updates : शेअर बाजारात आज झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. तेजीसह सुरुवात झालेल्या बाजार घसरणीसह बंद झाला.
Share Market Updates : आज सकाळी तेजीसह सुरुवात झालेल्या भारतीय शेअर बाजारात (Share Market) मोठी घसरण दिसून आली. आठवड्यातील व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात विक्रीचा जोर दिसून आला. त्याच्या परिणामी आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 897.28 अंकांच्या घसरणीसह 58,237.85 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 258.60 अंकांच्या घसरणीसह 17,154.30 अंकांवर बंद झाला.
अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रात झालेल्या घडामोडीच्या परिणामी आज बाजाराची सुरुवात घसरणीसह होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, त्याच्या उलट बाजारात तेजीसह सुरुवात झाली. मात्र, दुपारच्या सुमाराम नफावसुलीचा जोर वाढू लागल्याने बाजारात पडझड झाली. आज दिवसभरातील उच्चांकाच्या तुलनेत सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला होता. मात्र, त्यानंतर किंचीत खरेदीचा जोर दिसून आला. त्यामुळे बाजार बंद होताना सेन्सेक्स 897.28 अंकांच्या घसरणीसह 58,237.85 अंकांवर बंद झाला.
मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी 772 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 2834 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. 154 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. डॉलरच्या तुलनेत आज रुपयात 8 पैशांची घसरण झाली. रुपया आज 82.12 वर स्थिरावला. सेन्सेक्समधील 30 पैकी फक्त एकाच कंपनीच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, निफ्टी 50 पैकी 45 कंपन्यांचे शेअर दर घसरले असून 4 कंपन्यांचे शेअर दर वधारले. एका कंपनीच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.
इंडेक्स | किती अंकावर स्थिरावला | दिवसभरातील उच्चांक | दिवसभरातील नीचांक | किती टक्के बदल |
BSE Sensex | 58,237.85 | 59,510.92 | 58,094.55 | -1.52% |
BSE SmallCap | 27,371.95 | 27,961.03 | 27,313.33 | -2.08% |
India VIX | 16.22 | 16.43 | 13.41 | 20.89% |
NIFTY Midcap 100 | 30,106.85 | 30,742.30 | 30,023.85 | -1.99% |
NIFTY Smallcap 100 | 9,118.50 | 9,333.10 | 9,091.00 | -2.23% |
NIfty smallcap 50 | 4,111.05 | 4,212.10 | 4,095.95 | -2.26% |
Nifty 100 | 16,997.30 | 17,358.55 | 16,960.00 | -1.43% |
Nifty 200 | 8,924.70 | 9,112.85 | 8,904.60 | -1.51% |
Nifty 50 | 17,154.30 | 17,529.90 | 17,113.45 | -1.49% |
आज बाजारातील सर्वच इंडेक्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. बीएसई मिडकॅपमध्ये 1.8 टक्के आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 2 टक्क्यांची घसरण दिसून आली.
दिवसभरातील व्यवहारात इंडसंइड बँक, एसबीआय, टाटा पॉवर,, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि आयशर मोटर्स या कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. तर, टेक महिंद्रा आणि अपोलो हॉस्पिटल आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसली.
गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी बुडाले!
शेअर बाजारात झालेल्या घसरणीच्या परिणामी गुंतवणूकादारांना मोठा फटका बसला आहे. मुंबई शेअर बाजारावर लिस्टेड असलेल्या कंपन्यांचा मार्केट कॅप (बाजार भांडवल) घसरला आहे. शुक्रवारी बीएसईचा मार्केट कॅप 262.61 लाख कोटी रुपये इतका होता. तर, आज झालेल्या घसरणीमुळे मार्केट कॅप 258.70 लाख कोटी रुपयांवर आला आहे. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना 3.90 लाख कोटींचा फटका बसला आहे.