(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर गुंतवणुकीतही 'मास्टर-ब्लास्टर'! 5 कोटींच्या गुंतवणुकीचे केले 23 कोटी; जाणून घ्या प्लॅन
Sachin Tendulkar Investment : सचिन तेंडुलकरच्या गुंतवणुकीनंतर वीवीएस लक्ष्मण, पीवी सिंधु आणि साइना नेहवाल यांनी आझाद इंजिनिअरिंग (Azad Engineering) या कंपनीमध्ये पैसे गुंतवले आहेत.
Investment Plan : क्रिकेटचा देव अर्थात मास्टर-ब्लास्टर (Master Blaster) सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी जगभरात प्रिय आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिनच्या (Sachin Tendulkar) बॅटचं वादळ थांबलं आहे पण आता त्याने दुसऱ्या पिचवर दमदार बॅटिंग करण्यास सुरुवात केली आहे. सचिन तेंडुलकरने गुंतवणुकीच्या खेळपट्टीवर (Investment Plan) आक्रमक फलंदाजी सुरू केली आहे. सचिन तेंडुलकरने 9 महिन्यांपूर्वी एका कंपनीत 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, जी आता अंदाजे 23 कोटी रुपये झाली आहे. अशा प्रकारे त्याने 9 महिन्यांत 360 टक्के परतावा मिळवला आहे. त्याच्या या गुंतवणुकीबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
'या' कंपनीत गुंतवले 5 कोटी रुपये
सचिन तेंडुलकरने 6 मार्च रोजी आझाद इंजिनिअरिंग (Azad Engineering) या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान सोल्यूशन्स पुरवणाऱ्या कंपनीमध्ये 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. ही कंपनी ऊर्जा, एरोस्पेस, संरक्षण आणि तेल आणि वायू क्षेत्रात सेवा पुरवते. आझाद इंजिनीअरिंगने नुकताच आपला आयपीओ बाजारात आणला होता. याला बाजारातून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या कंपनीत सचिन तेंडुलकरचे 4,38,210 शेअर्स आहेत.
फायदा आणखी वाढण्याची शक्यता
आझाद इंजिनिअरिंग हैदराबादस्थित कंपनी आहे. आझाद इंजिनिअरिंग कंपनीचा आयपीओ पुढील आठवड्यात बाजारात लिस्टिंग (Share Market Listing) होईल. कंपनीने आपल्या IPO मध्ये इश्यूची किंमत 524 रुपये ठेवली आहे. कंपनीची या दराने लिस्टिंग झाल्यास सचिन तेंडुलकरचे 5 कोटी रुपये थेट 22.96 कोटी रुपये होतील. सचिनला IPO मधून मल्टीबॅगर परतावा मिळेल. लिस्टिंगच्या दिवशी सर्वांच्या नजरा या कंपनीच्या शेअरच्या किमतीवर असतील. त्यात वाढ किंवा घट झाल्यामुळे सचिनचा परतावा कमी किंवा जास्तही होऊ शकतो. या 740 कोटी रुपयांच्या IPO चा प्रीमियम ग्रे मार्केटमध्ये 65 टक्के आहे. सचिन तेंडुलकरने 114.1 रुपये किमतीला कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते.
'या' कंपनीत अनेक खेळाडूंनी गुंतवले पैसे
या कंपनीमध्ये सचिन तेंडुलकरशिवाय अनेक खेळाडूंनी गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवली आहे. सचिन तेंडुलकरने आझाद इंजिनीअरिंगमध्ये पैसे गुंतवल्याची बातमी बाजारात येताच एकापाठोपाठ एक अनेक खेळाडूंनी त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आणि त्यात पैसे गुंतवले. सचिननंतर अवघ्या पाच दिवसांनी पीव्ही सिंधू, सायना नेहवाल आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी आझाद इंजिनिअरिंग कंपनीमध्ये प्रत्येकी 1 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. आता त्याची रक्कमही 2.3 कोटींवर पोहोचली आहे. या खेळाडूंना त्यांच्या गुंतवणुकीवर 130 टक्के परतावा मिळाला.
(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी असून गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमपूर्ण असते. गुंतवणुकीपूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.)