RBI: रेपो दरात किती वाढ? रिझर्व्ह बँकेकडून आज पतधोरण जाहीर होणार
RBI Meeting : रिझर्व्ह बँकेकडून आज पतधोरण जाहीर होणार असून रेपो दरात बदल होण्याची शक्यता आहे.
RBI : भारताची मध्यवर्ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आज पतधोरण जाहीर केले जाणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून मागील दोन दिवसांपासून पतधोरण आढावा बैठक सुरू आहे. आज रिझर्व्ह बँकेकडून आज बैठकीतील निर्णयाची घोषणा करण्यात येणार आहे. आरबीआयकडून रेपो दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. रेपो दरात वाढ झाल्यास कर्जे आणखी महाग होणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून वाढत्या महागाईला अटकाव करण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहे.
एप्रिल महिन्यात किरकोळ महागाईने मागील आठ वर्षाचा उच्चांक गाठला होता. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दर हा 7.79 टक्के इतका नोंदवण्यात आला. महागाईच्या या आकड्याने केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या चिंतेत वाढ केली. सध्या रेपो दर 4.40 टक्के असून हा दर 4.75 टक्के इतका होण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाल्यास कर्ज आणि कर्जाचे हप्ते आणखी महाग होणार आहे.
EMI महाग होणार?
आरबीआयकडून रेपो दरात वाढ होण्याची शक्यता असल्याने कर्जे महाग होण्याची शक्यता आहे. आधीच कर्ज घेतलेल्यांचे कर्जाचे हप्ते वाढवण्याची दाट शक्यता आहे. रेपो दर वाढल्यास नवीन कर्ज घेणाऱ्यांना अधिक व्याज दराने कर्ज उपलब्ध होईल.
मागील बैठकीतही दरवाढ
गेल्या महिन्यात झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत मध्यवर्ती बँकेने रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती. 4 मे रोजी झालेल्या पतधोरण बैठकीनंतर RBI ने अचानक रेपो दर 40 बेसिस पॉईंट्सने वाढवला होता.कॅश रिझर्व्ह रेशो 50 बेसिस पॉईंट्सने 4 टक्क्यांवरून 4.50 टक्क्यांवर नेला.
>> रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.
>> रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.