Digital Currency: आरबीआयने लॉन्च केली भारताची डिजिटल करन्सी, डिजिटल रुपया कसा काम करेल? जाणून घ्या
Digital Currency: भारतीय रिजर्व्ह बँकेने (RBI) आज भारताची पहिली डिजिटल करन्सी म्हणजेच डिजिटल रुपया लॉन्च केला आहे. डिजिटल करन्सीला चालना देण्यासाठी आरबीआयने हा पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे, असं बोललं जात आहे.
Digital Currency: भारतीय रिजर्व्ह बँकेने (RBI) आज भारताची पहिली डिजिटल करन्सी म्हणजेच डिजिटल रुपया लॉन्च केला आहे. डिजिटल करन्सीला चालना देण्यासाठी आरबीआयने हा पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे, असं बोललं जात आहे. भारताची ही डिजिटल करन्सी लॉन्च होण्याच्या आधीपासूनच क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल रुपयाबाबत वाद सुरू झाले आहेत. यातच डिजिटल रुपया कसा काम करेल आणि डिजिटल रुपया आणि बँक डिपॉझिटमध्ये काय फरक आहे? याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
डिजिटल रुपया म्हणजे नक्की काय आहे?
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजेच सीबीडीसी भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेलं चलन आहे. मात्र डिजिटल स्वरूपात असणार आहे. असं असेल तरी याची तुम्ही नोटांसारखीच अदलाबदल करू शकता. तसेच याचा वापर करून तुम्ही रोख रक्कम सारखेच व्यवहार ही करू शकता. सोप्या भाषेत जशी शंभर रुपयांची नोट हे भारताचे कायदेशीर चलन आहे. तसेच हे देखील भारताचे कायदेशीर चलन आहे. तसेच या दोघांचे मूल्यही सामान आहे.
या करन्सीला भारतीय बाजारात दोन स्वरूपात आणले जाणार. ज्यात पहिले CBDC-R म्हणजेच Retail purpose साठी आणि दुसरे CBDC-w म्हणजेच Wholesale Purpose साठी असणार आहे. सध्या होलसेल ट्रांजेक्शनसाठी पायलेट प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आले आहे. ज्यासाठी 9 बँकांची निवड करण्यात आली आहे. यात स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचएसबीसीचा समावेश करण्यात आला आहे.
डिजिटल करन्सी आणि बँक ठेवीत काय फरक आहे?
आरबीआयने ही करन्सी आणण्यामागचे कारण सांगितले आहे. आरबीआयने सांगितले आहे की, डिजिटल करन्सी बाजारात आल्यानंतर नोटांना छापण्यासाठी जो खर्च येतो, तो कमी होईल. यातच आता असा प्रश्न निर्माण होतो की डिजिटल करन्सी आणि बँकेत ठेवी स्वरूपात ठेवलेल्या पैशांमध्ये काय फरक आहे? सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, तुम्ही बँकेत ठेवलेले पैसे ही बँकेची जबाबदारी आहे. मात्र डिजिटल करन्सी ही सरळ आरबीआयची जबाबदारी आहे. तसेच बँकेत पैसे ठेवायला किंवा वापरायला बँक खात्याची आवश्यकता असते. मात्र डिजिटल करन्सीच्या वापरासाठी बँक खात्याची आवश्यकता नाही. यातील महत्वाचा फरक म्हणजे बँक बुडाली तर ग्राहकांचे पैसे अडकतात. मात्र डिजिटल करन्सीमध्ये तुम्हाला अशा कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
डिजिटल करन्सी क्रिप्टो करन्सीपेक्षा वेगेळी आहे
डिजिटल रुपया हा व्यवहारावर आधारित आहे. क्रिप्टोमध्ये बाजारातील चढ-उतार महत्त्वाचे असतात. ही करन्सी आरबीआयने सुरू केली आहे आणि ती केवळ त्यांच्याद्वारे नियंत्रित केली जाते. दुसरीकडे, क्रिप्टो एक खाजगी उपक्रम आहे, ज्यामुळे त्यात खूप धोका आहे.