RBI Press Conference : महागाईची चिंता...व्याज दरात वाढ... आरबीआयच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
RBI Press Conference : रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. आरबीआयच्या या निर्णयानंतर व्याज दरात वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
RBI Press Conference : मागील तीन दिवसांपासून भारतीय रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा बैठक सुरू होती. ही बैठक संपल्यानंतर आज आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर झाले. आज झालेल्या पत्रकार परिषदेत गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी रेपो व्याज दर वाढीची घोषणा केली. महागाईबाबत आरबीआयने चिंता व्यक्त केली.
आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे:
> जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रवास मंदीकडे
> भारतीय अर्थव्यवस्थेवरही भू-राजकीय परिणामांचा प्रभाव
> भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत
> महागाई कमी होताना दिसतेय
> यंदा मान्सून सामान्य सरासरीपेक्षाही चांगला होत आहे. त्याचे परिणामही चांगले दिसतील.
> रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ, नवीन दराच्या घोषणेनंतर रेपो रेट 5.40 टक्क्यांवर ; तात्काळपणे व्याज दर लागू
> एसडीएफ दर 5.15 टक्क्यांवर, तर मार्जिनल स्टॅण्डिंग फॅसिलिटी दर (MSF) 5.15 टक्क्यांहून 5.65 टक्के.
> सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 7.2 टक्के राहण्याचा अंदाज
> मान्सून सामान्य राहिल्यास आणि कच्च्या तेलाच्या किंमती 105 डॉलर प्रति बॅरल राहिल्यास चालू आर्थिक वर्षात महागाई दर 6.7 टक्के राहण्याचा अंदाज
> जागतिक बाजारातील अस्थिर वातावरणामुळे महागाई वाढण्याचा फटका
> पुराचा फटका बसल्यास महागाईत वाढ होण्याची शक्यता
> खाद्य तेलाच्या किंमतीत आणखी घट बघायला मिळणार
> भारतीय रुपयात होत असलेली घसरण ही डॉलर मजबूत होत असल्यामुळे होत आहे. अन्य देशांच्या चलनाच्या तुलनेत रुपयाची घसरण कमी आहे. आरबीआयच्या धोरणामुळे रुपयाच्या घसरणीवर लगाम
> पहिल्या तिमाहीत देशात 1360 कोटी डॉलरची परदेशी गुंतवणूक आली.
>> रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.
>> रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.