Bisleri कंपनी विकण्यामागील खरं कारण काय? जाणून घ्या, Inside Story
Tata Bisleri Deal: बिस्लेरी यशाच्या शिखरावर, पण तरीही विकणार मालक. कारण सांगताना म्हणाले, मुलीमुळे कंपनी विकायला काढली. प्रकरण नेमकं काय?
Tata Bisleri Deal: पाण्याची बाटली विकत घेण्यासाठी दुकानात गेलं की, "एक बिस्लेरी (Bisleri) द्या" असं म्हणतच प्रत्येकजण पाण्याची बाटली मागतं. मग त्या पाण्याच्या बाटलीचा ब्रँड कोणताही असो, ती आपल्यासाठी बिस्लेरीच असते. इतकं अढळ स्थान आहे बिस्लेरीचं भारतीयांच्या आयुष्यात. बिस्लेरीचा इतिहास भारतात सुमारे 5 दशकांचा आहे. बिस्लेरीला भारतात बाटलीबंद पाणी विकण्याच्या उद्योगात लोकप्रिय करण्याचं खरं श्रेय उद्योजक रमेश चौहान (Ramesh Chauhan) यांना जातं. वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी या कंपनीचा सौदा त्यांनी केला होता. आज त्यांचं वय 82 वर्ष आहे.
बिस्लेरी कंपनी उभारण्यात आणि तिचं नाव सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात रमेश चौहान यांचं मोलाचं योगदान आहे. अगदी तारुण्यापासून वृद्धापकाळापर्यंतचा वेळ त्यांनी बिस्लेरीसाठी दिला. त्यांनी बिसलेरी कंपनी अवघ्या 4 लाखांना विकत घेतली होती. पण आज तीच कंपनी हजारो कोटींची झाली आहे. भारतात पॅकेज्ड वॉटरची बाजारपेठ 20,000 कोटी रुपयांहून अधिक आहे. यातील 60 टक्के असंघटित आहेत. संघटित बाजारपेठेत बिसलरीचा वाटा जवळपास 32 टक्क्यांचा आहे. म्हणजेच, देशात विकल्या जाणाऱ्या पाण्याच्या बाटल्यांपैकी दर तिसरी बाटली ही बिस्लेरीची असते. पण कंपनी यशाच्या शिखरावर असतानाही रमेश चौहान यांनी बिस्लेरी कंपनी विकण्याचा निर्णय घेतला आहे. ही बातमी समोर येताच, प्रत्येक सर्वसामान्याच्या मनात प्रश्न निर्माण झालाय, का?
आंतरराष्ट्रीय ब्रँड भारतात लोकप्रिय केल्यानंतर रमेश चौहान यांनी बिसलेरी कंपनी विकण्याचा निर्णय घेतला आहे. पण का? याचं उत्तर स्वतः रमेश चौहान यांनी स्वतः सांगितलं आहे. आता तो विकण्याचा निर्णय का घेतलाय? याचं कारण सांगून त्यांनी सर्वांना आणखी गोंधळात टाकलं. त्यांनी सांगितलं की, कंपनी नफ्यात आहे, आणि व्यवसायही वर्षानुवर्षे वाढत आहे.
वाढतं वय आणि आरोग्याच्या तक्रारींमुळे निर्णय
ईटीच्या रिपोर्टनुसार, रमेश चौहान 82 वर्षांचे आहेत, वृद्धापकाळामुळे तसेच सातत्यानं जाणवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींमुळे त्यांनी ही कंपनी विकण्याचा निर्णय घेतला आहे. अहवालात असं म्हटलं आहे की, चौहान यांच्यानंतर बिस्लेरीला पुढे नेण्यासाठी किंवा बिस्लेरीची घौडदौड सुरु ठेवण्यासाठी कोणीच उत्तराधिकारी नाही.
रमेश चौहान यांच्या कन्या जयंती चौहान?
रमेश चौहान यांनी उत्तराधिकारी कोणीच नाही, असं वक्तव्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या. चौहान यांना एक मुलगी आहे. जयंती चौहान असं त्यांचं नाव. मिळालेल्या माहितीनुसार, रमेश चौहान यांच्या कन्या जयंती चौहान 37 वर्षांच्या आहेत. त्या बिस्लेरी कंपनीच्याच व्हॉईस चेअरपर्सन आहेत.
कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जयंती यांचे वडील आणि बिस्लेरीचे संस्थापक रमेश चौहान यांनी वयाच्या 24 व्या वर्षी कंपनी त्यांच्या मुलीकडे सोपवली होती. सुरुवातीला जयंती यांच्याकडे दिल्ली कार्यालयाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर 2011 मध्ये मुंबई बिसलेरी कार्यालयाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्यानंतर जागतिक स्तरावरही ब्रँड वाढवण्यातही जयंती यांचा मोठा वाटा आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रमेश चौहान यांनी कन्या जयंती यांचं बिस्लेरी कंपनीमध्ये कमी स्वारस्य हे बिस्लेरी विकण्यामागील एक कारण असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांची मुलगी आणि बिस्लेरीच्या उपाध्यक्ष जयंती (Jayanti) हा व्यावसाय सांभाळण्यासाठी फारशा उत्सुक नाहीत. त्यामुळेच रमेश चौहान यांनी बिस्लेरी विकण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या बिस्लेरीचे अध्यक्ष आणि एमडी पदाची जबाबदारी रमेश चौहान यांच्या खांद्यावर आहे, तर त्यांची पत्नी जैनब चौहान या कंपनीच्या संचालक आहेत. रिपोर्टनुसार, 'बिस्लेरी इंटरनॅशनल'चे चेअरमन रमेश चौहान म्हणाले की, भविष्यात ही कंपनी कोणालातरी सांभाळावी लागेल, त्यामुळे आम्ही योग्य पर्याय शोधत आहोत. त्यांच्या मुलीला व्यवसाय चालवण्यात फारसा रस नाही. तसेच, टाटासोबत केवळ चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसेच, करारावर शिक्कामोर्तब झालेला नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
7000 कोटींचा होऊ शकतो करार
मीडिया रिपोर्टनुसार, बिस्लेरी खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या कंपन्यांच्या शर्यतीत टाटा कंपनी आघाडीवर आहे. हा करार 6,000-7,000 कोटी रुपयांचा असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र रमेश चौहान यांनी सध्या सर्व वृत्त फेटाळून लावली असून सर्व कंपन्यांशी चर्चा सुरु असल्याचं म्हटलं आहे.
बिस्लेरीचा मजबूत व्यवसाय
वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, बिस्लेरीचे देशभरात 122 पेक्षा जास्त ऑपरेशनल प्लांट आहेत, तर भारतभरात सुमारे 5,000 ट्रक्ससह 4,500 हून अधिक डिस्ट्रीब्यूटर नेटवर्क आहे.
1969 मध्ये विकत घेतली होती Bisleri
1969 मध्ये, चौहान कुटुंबाच्या पार्ले कंपनीनं बिस्लेरी (इंडिया) लिमिटेड विकत घेतलं. त्यावेळी बिसलेरी कंपनीचा सौदा केवळ 4 लाख रुपयांना झाला होता. 1995 मध्ये त्याची कमान रमेश जे. चौहान यांच्या हाती आली. यानंतर पॅकेज्ड वॉटरचा बिजनेस इतक्या वेगानं चालला की, आता बिस्लेरीचं देशभरात सर्वसामान्यांपासून अगदी श्रीमतांच्या ओठी ठसलं आहे.