(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ना पैसे बुडण्याचं टेन्शन, ना टॅक्सचं; Post Office च्या 'या' योजनेत पैसे गुंतवा आणि कोट्यधीश व्हा!
Post Office Scheme: पै पै जोडून आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करणारे सर्वसामान्य कोणत्याही योजनेत पैसे टाकण्यापूर्वी खूप विचार करतात. यावेळी त्यांच्या मनात एकच भिती असते ती म्हणजे, गुंतवलेले पैसे आपण गमावले तर?
Post Office Scheme: आपण आयुष्यात खूप मोठ्ठं व्हावं, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. एवढे पैसे कमवावेत, एवढे पैसे कमवावेत की, अगदी सगळी स्वप्न आपल्या पायाशी लोळण घेतील, असंही प्रत्येकालाच वाटत असतं. तुम्हीही लखपती, कोट्यधीश होण्याचं स्वप्न पाहत असाल, तर आज आम्ही एक फंडा तुम्हाला सांगणार आहोत. हा फंडा तुमची मोठ्ठी स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला मदत करेल. पण, यासाठी तुम्हाला शिस्तबद्ध गुंतवणूक करावी लागेल आणि त्यासोबतच स्वतःवर थोडा संयम ठेवावा लागेल. कारण तुमचं कोट्यधीश होण्याचं स्वप्न असं सहजासहजी पूर्ण होण्यासारखं नाही.
पै पै जोडून आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक (Investment Plan) करणारे सर्वसामान्य कोणत्याही योजनेत (PPF Scheme) पैसे टाकण्यापूर्वी खूप विचार करतात. यावेळी त्यांच्या मनात एकच भिती असते ती म्हणजे, गुंतवलेले पैसे आपण गमावले तर? किंवा आपली फसवणूक झाली तर? परंतु आम्ही तुम्हाला ज्या पोस्ट ऑफिस स्कीमबद्दल सांगत आहोत, ती एक सरकारी हमी योजना आहे. योजना सरकारी असल्यामुळे जोखीम नाही, त्यामुळे तुम्ही गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात.
आज आम्ही तुम्हाला पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF बद्दल सांगणार आहोत. 15 वर्षांच्या कार्यकाळातील ही योजना प्रत्येक सामान्य माणसाला कोट्यधीश बनवू शकते. यासाठी फक्त एक युक्ती वापरावी लागेल. ती कोणती? जाणून घेऊयात सविस्तर...
PPF योजनेद्वारे कोणतीही व्यक्ती कोट्यधीश कशी बनू शकते?
पीपीएफ म्हणजे, गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय. कोणतीही व्यक्ती पीपीएफमध्ये वार्षिक कमाल 1.5 लाख रुपये जमा करू शकते आणि किमान ठेव मर्यादा वार्षिक 500 रुपये आहे. सध्या या योजनेवर 7.1 टक्के व्याज दिलं जातंय. आता कोट्यधीश होण्यासाठी तुम्हाला या योजनेत वार्षिक 1.5 लाख रुपये जमा करावे लागतील. ही योजना 15 वर्षांत मॅच्युअर होत असली, तरी ती 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये देखील वाढवता येते. तुम्ही वापरता ती एकमेव युक्ती म्हणजे, तुमचं पीपीएफ खातं 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये किमान दोनदा योगदानासह वाढवणं. म्हणजेच, तुम्हाला किमान 25 वर्षांसाठी वार्षिक 1.5 लाख रुपये (12,500) जमा करावे लागतील.
तुम्ही असं केल्यास, 25 वर्षांत तुम्ही एकूण 37,50,000 रुपये गुंतवाल. 7.1 टक्के व्याजदरानुसार तुम्हाला 65,58,015 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे, तुमची गुंतवणूक आणि त्यावर मिळालेल्या व्याजाच्या रकमेसह 25 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 1,03,08,015 रुपये मिळतील. दुसरीकडे, तुम्ही या योजनेत 30 वर्षे योगदान देत राहिल्यास, तुम्हाला मॅच्युरिटी रक्कम म्हणून 1,54,50,911 रुपये मिळू शकतात आणि जर तुम्ही तीच गुंतवणूक 35 वर्ष चालू ठेवली तर तुम्हाला मॅच्युरिटीनंतर 2,26,97,857 रुपये मिळतील. पीपीएफ योजनेचा एक फायदा म्हणजे, त्यात जमा केलेले पैसे, मिळणारं व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे.
(वर देण्यात आलेली पोस्ट ऑफिसच्या योजनेची माहिती आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :