Aadhar Pan Card Link : आधार-पॅन कार्ड लिंक नाही, मग तुमचा पगार बँकेत जमा होणार नाही?
Aadhar and Pan Card : आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झाले नसल्यास पॅन कार्ड निष्क्रिय असल्याचे दाखवले जाते. यामुळे पगार बँकेत जमा होणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मुंबई : आधार आणि पॅन कार्ड लिंक (Aadhar Card and Pan Card Link) न झालेल्यांचे पॅन कार्ड आता निष्क्रिय (Pan Card Deactivate) असल्याच्या श्रेणीत आले आहेत. आयकर विभागाच्या (Income Tax) नियमानुसार, निष्क्रिय पॅन कार्ड म्हणजे एक प्रकारे त्या व्यक्तीकडे पॅन कार्ड नसल्यासारखे आहे. पॅन कार्डची माहिती दिल्याशिवाय कोणतीही व्यक्ती बँक खाते उघडू शकणार नाही. बँक एफडीमध्ये गुंतवणूक करू शकणार नाही. तुमचा सध्याचा पॅन निष्क्रिय झाला असेल, तर बँकिंग व्यवहारांबाबत तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील? उदाहरणार्थ, निष्क्रिय पॅनचा बँक खात्यातील पगाराच्या क्रेडिटवर परिणाम होईल का? याचा डेबिट किंवा क्रेडिट कार्ड जारी करण्यावर किंवा वापरावर परिणाम होईल का?
पॅन निष्क्रीय असल्यास पगार मिळण्यात अडचण येणार?
जर पॅन आधारशी लिंक नसेल, तर असा पॅन निष्क्रिय मानला जाईल. म्हणजेच ती व्यक्ती आपल्या पॅनची माहिती देऊ शकणार नाही. मात्र, पॅन कार्ड हे आधार सोबत लिंक नसल्याने पॅन कार्ड निष्क्रिय झाले असले तरीही तुमचा पगार बँक खात्यात जमा केला जाईल. कंपनी तुम्हाला पगार देते आणि टीडीएस कापते. पॅन कार्ड निष्क्रिय झाला तरी ग्राहकाच्या खात्यात पगार जमा करण्यापासून बँक रोखू शकत नाही. ज्यांचे पॅन आधारशी लिंक नाही अशा बँक खात्यांमध्ये पगार हस्तांतरित होण्यास वेळ लागू शकतो असे मत काहींनी व्यक्त केले आहे.
काही सेवांपासून राहावे लागू शकते वंचित
जर तुमचा पॅन निष्क्रिय केला गेला असेल, तर तुम्ही काही सेवांचा लाभ घेऊ शकणार नाही. काही सेवांचा, योजनांचा फायदा मिळवण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. तुमचे पॅन कार्ड- आधार कार्डशी जोडल्यानंतर तुम्ही अनेक गोष्टी करू शकता.
पॅन कार्ड पुन्हा अॅक्टिव्ह कसे करावे?
जर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले असेल, तर तुम्ही पॅन कार्ड पुन्हा अॅक्टीव्ह करू शकता. दंडाची रक्कम भरून तुम्ही पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक करू शकता. त्यानंतर कमाल 30 दिवसात तुमचे पॅन कार्ड अॅक्टीव्ह होईल.
आधार कार्ड पॅनशी लिंक आहे का कसं तपासणार?
सर्व प्रथम आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईट www.incometaxindiaefiling.gov.in म्हणजेच आता नवीन वेबसाईट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर जा. खाली दिलेल्या लिंक आधारच्या पर्यायावर क्लिक करा. आपलं स्टेटस पाहण्यासाठी Click here वर क्लिक करा. नवीन विंडोवर पॅन आणि आधार तपशील भरा. तिथे आधार आणि पॅन लिंक आहे की नाही तपासा आणि नसेल तर लगेच लिंक करा.