रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारानंतर 24 तासातच त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यात आला आहे. रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा (Noel Tata) यांची टाटा ट्रस्टचे (Tata Trust) अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
Noel Tata : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे 9 ऑक्टोबरला निधन झाले. त्यांच्या निधनानंतर, सर्वात मोठा प्रश्न होता की त्यांचा उत्तराधिकारी कोण होणार? टाटा ट्रस्टच्या ज्या पदावर रतन टाटा 1991 पासून कार्यरत होते त्या पदावर कोण बसणार? रतन टाटांच्या विचारांशी बांधिलकी असणारा उत्तराधिकारी कोण असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारानंतर 24 तासांच्या आतच त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यात आला आहे. रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा (Noel Tata) यांची टाटा ट्रस्टचे (Tata Trust) अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ते रतन टाटा यांचे उत्तराधिकारी ठरले आहेत.
आज सकाळी 11 वाजता टाटा ट्रस्ट बोर्डाची बैठक बोलावण्यात आली होती. ही बैठक बॉम्बे हाऊस (टाटा ट्रस्ट ऑफिस) पासून दूर असलेल्या कफ परेड, मुंबई येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या टॉवरच्या 26 व्या मजल्यावर असलेल्या टाटा कार्यालयात बोलावण्यात आली होती. या बैठकीला टाटा ट्रस्ट बोर्डाचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम दिवंगत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रद्धांजली सभेत मंडळाच्या सदस्यांनी रतन टाटा यांच्या आठवणींना उजाळा दिला.
या बैठकीला कोण-कोण उपस्थित होते?
नोएल टाटा
नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र बंधू आहेत. ते टाटा सन्सच्या संचालक मंडळावर नाहीत, तर ट्रेंट आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या बोर्डाचे अध्यक्ष आहेत.
जिमी एन टाटा
जिमी एन टाटा हे रतन टाटा यांचे धाकटे बंधू आहेत. ते देखील बैठकीला उपस्थित होते.
वेणू श्रीनिवासन
वेणू श्रीनिवासन हे टाटा ट्रस्टचे उपाध्यक्ष आहेत. सुंदरम हे क्लेटन लिमिटेड आणि टीव्हीएस मोटर कंपनीचे मानद अध्यक्ष आहेत. ते टाटा सन्सच्या बोर्डावर देखील आहेत आणि टाटा सन्सच्या बोर्डावर टाटा ट्रस्टचे प्रतिनिधित्व करतात.
विजय सिंह
विजय सिंह हे टाटा ट्रस्टचे उपाध्यक्ष, माजी IAS अधिकारी आहेत. ट्रस्टचे प्रतिनिधी म्हणून ते टाटा सन्सच्या संचालक मंडळावरही आहेत.
मेहली मिस्त्री
मेहली मिस्त्री हे देशातील एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. मिस्त्री ऑक्टोबर 2022 मध्ये टाटा ट्रस्टमध्ये सामील झाले आणि एम पालोनजी ग्रुप ऑफ कंपनीज चालवतात. मिस्त्री हे रतन टाटा यांचे जवळचे विश्वासू मानले जात होते.
जहांगीर एच सी
जहांगीर एच सी हे पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल चालवतात. 2022 मध्ये ते टाटा ट्रस्टमध्ये रुजू झाले होते.
दारियस खंबाटा
दारियस खंबाटा हे मुंबईतील ज्येष्ठ वकील आहेत. खंबाटा मुंबईच्या कायदेशीर वर्तुळात प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये टाटांचे प्रतिनिधित्व केले आहे.
प्रमित झावेरी
प्रमित झावेरी हे सिटी इंडियाचे माजी सीईओ आहेत. प्रमित बँकेतून निवृत्त झाल्यानंतर लगेचच टाटा ट्रस्टमध्ये सामील झाले आहेत.
संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने नोएल टाटा यांच्या नावाला मुंजरी
श्रद्धांजली सभेनंतर टाटा ट्रस्ट बोर्डाची बैठक सुरू झाली. टाटा ट्रस्ट बोर्डाची बैठक सुरू होण्यापूर्वी नोएल टाटा, डॅरियस खंबाटा आणि मेहली मिस्त्री हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे मानले जात होते. परंतू, टाटा ट्रस्टचे उपाध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांनी नोएल टाटा हे रतन टाटा यांचे उत्तराधिकारी पदासाठी योग्य असल्याचे मत मांडले. यावर सर्वांनी एकमताने होकार दिला. टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदासाठी नोएल टाटा यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांची जागा नोएल घेणार हे निश्चित झाले. रतन टाटा मार्च 1991 पासून टाटा ट्रस्टचे अध्यक्ष होते.
रतन टाटा आणि टाटा समूहाचा वारसा पुढे नेण्यासाठी तत्पर : नोएल टाटा
नोएल टाटा यांची निवड झाल्यानंतर बोर्ड सदस्यांनी त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नोएल टाटा यांनी रतन टाटा यांच्या जीवनावर एक भावपूर्ण भाषण केले. ही जबाबदारी स्वीकारुन पुढे जाणार असल्याचे ते म्हणाले. माझ्या सहकारी विश्वस्तांनी माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीमुळे मी अत्यंत आदरणीय आणि विनम्र आहे. मी श्री रतन टाटा आणि टाटा समूहाच्या संस्थापकांचा वारसा पुढे नेण्यासाठी तत्पर आहे. हे ट्रस्ट सामाजिक भल्यासाठी एक अनोखे माध्यम आहे. आम्ही आमच्या विकासात्मक आणि परोपकारी उपक्रमांना पुढे नेण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीत आमची भूमिका बजावण्यासाठी स्वतःला समर्पित करु असे नोएल टाटा म्हणाले.
नोएल हे टाटा ट्रस्टचे 11 वे अध्यक्ष
टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष म्हणून नोएल टाटा यांची नियुक्ती झाली आहे. नोएल टाटा आता टाटा समूहाच्या दोन महत्त्वाच्या धर्मादाय ट्रस्टचे प्रमुख असणार आहेत. नोएल हे टाटा ट्रस्टचे 11 वे अध्यक्ष बनले आहेत. दोराबजी हे टाटा ट्रस्टचे 6 वे अध्यक्ष बनले आहेत. दोराबजी टाटा ट्रस्ट आणि रतन टाटा ट्रस्ट यांची मिळून टाटा सन्स या टाटा समूहाची होल्डिंग कंपनी 66 टक्के भागीदारी आहे. टाटा ट्रस्ट हे भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टपैकी एक आहे, FY-23 मध्ये या ट्रस्टने सुमारे 470 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
महत्वाच्या बातम्या:
रतन टाटा यांचा उत्तराधिकारी म्हणून नोएल टाटा यांचीच निवड का? 'हे' आहेत त्यांचं सामर्थ्य दाखवणारे पाच पुरावे!