Nifty Lifetime High: शेअर बाजाराची विक्रमी झेप; निफ्टीने ओलांडला 18600 चा टप्पा, सेन्सेक्स 62500 अंकावर
Nifty Lifetime High: भारतीय शेअर बाजारात सुरू असलेल्या तेजीमुळे आज निफ्टी निर्देशांकाने उच्चांकी पातळी गाठली.
Nifty Lifetime High: सकाळी घसरणीसह सुरुवात झालेल्या भारतीय शेअर बाजारात आज ऐतिहासिक उसळण दिसून आली. मागील आठवड्यात विक्रमी पल्ला गाठल्यानंतर आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) उच्चांक गाठला आहे. निफ्टी निर्देशांक (Nifty All Time High) 18600 अंकांचा टप्पा ओलांडला असून सेन्सेक्सने (Sensex All Time High) 62600 अंकांचा टप्पा ओलांडला. सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा बाजारात घसरण दिसून आली. मात्र, त्यानंतर खरेदीचा जोर वाढला. आजच्या तेजीने निफ्टी निर्देशांकाने ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 376.30 अंकांनी वधारत 62669.94 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 92.10 अंकांनी वधारत 18604.90 अंकावर व्यवहार करत होता. 1976 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसत असून 1303 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.
निफ्टीत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर दरात 3.43 टक्क्यांची तेजी दिसत आहे. तर, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात 1.18 टक्क्यांची तेजी दिसत आहे. इन्फोसिसमध्ये 0.56 टक्के, बजाज फायनान्समध्ये 0.68 टक्के, नेस्लेमध्ये 1.33 टक्क्यांची तेजी दिसत आहे.
मागील दोन महिन्यात निफ्टी निर्देशांक 10 टक्क्यांनी वधारला आहे. मागील आठवड्यानंतर निफ्टीने आज सर्वकालिक उच्चांक गाठला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीला उच्चांकी पातळीवर नेण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने मोठी भूमिका बजावली. रिलायन्सचा शेअर दर तीन टक्क्यांनी वधारला. निफ्टीमध्ये रिलायन्सच्या शेअरने मागील पाच महिन्यातील उच्चांक गाठला. रिलायन्सचा शेअर 2,707.20 रुपयांवर व्यवहार करत होता.
निफ्टीमध्ये बीपीसीएलच्या शेअर दरात 4.27 टक्क्यांची तेजी दिसून आली. रिलायन्सच्या शेअर दरात 3.49 टक्के, हिरो मोटो कॉर्पच्या शेअर दरात 2.19 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्याशिवाय, एशियन पेंट्स, नेस्लेच्या शेअर दरात वाढ दिसून आली. तर, हिंदाल्को, जेएसडब्लू स्टील, टाटा स्टील, अपोलो हॉस्पिटलच्या शेअर दरात घसरण दिसून आली.
दरम्यान, आज सकाळी शेअर बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 277.29 अंकांच्या घसरणीसह 62,016.35 अंकांवर खुला झाला होता. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 82.20 अंकांच्या घसरणीसह 18,430.55 अंकांवर खुला झाला होता. त्यानंतर काही वेळेतच खरेदीचा जोर वाढू लागला.
इतर महत्त्वाच्या बातम्या: