(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Adani Group: अदानी कर्जाचा डोंगर कसा उतरवणार? कर्ज फेडण्यासाठी या पर्यायावर विचार सुरू
Adani Group: अदानी समूहाकडून बँकांचे कर्ज उतरवण्यासाठी निधी उभारण्यात येणार आहे. मागील काही वर्षात अदानी समूहाने बँकांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले आहेत.
Adani Group: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले भारतीय उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या नेतृत्त्वातील अदानी समूह बँकांचे कर्ज कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बँकेचे कर्ज फेडण्यासाठी अदानी समूहाकडून (Adani Group) किमान 5 अब्ज डॉलरचा निधी (Fund Raising) जमवण्यासाठी नियोजन सुरू आहे.
'ब्लूमबर्ग'ने दिलेल्या वृत्तानुसार, अदानी समूहावर बँकांचे कर्ज वाढत आहे. हे वाढणारे कर्ज कमी करण्यासाठी अदानी समूहाने Abu Dhabi Investment Authority आणि Mubadala Investment Co. आदी फर्मच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्या आहेत. त्याशिवाय, Canada Pension Plan Investment Board आणि Qatar Investment Authority सोबतही चर्चा केली आहे. या संस्थांच्या अधिकाऱ्यांनी फंड्स आणि सॉवरेन वेल्थ फंडबाबत माहिती घेतली आहे.
अदानी समूह निधी उभारणार
वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी Adani Enterprises Ltd ने पुढील वर्षापर्यंत 1.8 ते 2.4 अब्ज डॉलरचा निधी जमवण्यासाठीचे नियोजन केले आहे. त्याशिवाय, कंपनीकडून याबाबत चर्चा करण्यासाठी 25 नोव्हेंबर रोजी बैठक बोलवण्यात आली आहे. निधी उभारण्यासाठी अदानी समूह हा Adani Enterprises Ltd पुढील वर्षी 5 ते 10 अब्ज डॉलरचे शेअर्स बाजारात आणू शकतात. सध्या याबाबत निव्वळ चर्चा सुरू आहेत. याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नाही. याबाबत अदानी समूहाकडून कोणतीही अधिकृत निवेदन जारी करण्यात आले नाही.
मुकेश अंबानी यांनीदेखील वापरला होता हा पर्याय
याआधी, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेले रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनीही रिलायन्स इंडस्ट्रीजवरील बँकेचे कर्ज फेडण्यासाठी 2020 मध्ये 27 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम उभारली होती.
वृत्तानुसार, बँकांनी अदानी ग्रुपला कर्ज कमी करण्यास सांगितले आहे. सप्टेंबर महिन्यात रिसर्च फर्म क्रेडिटसाइट्सने आपल्या अहवालात अदानीच्या कंपन्यांवर निर्धारित मानकापेक्षा अधिक कर्ज असल्याचे सांगितले होते. परंतु कंपनीने हा अहवाल फेटाळून लावला. कंपनीवरील कर्ज हे सरकारने ठरवून दिलेल्या मानकांमध्ये असल्याचे अदानी समूहाने स्पष्ट केले होते. बँकांचे कर्ज फेडण्यासाठी कंपनी आपले शेअर्स इत्यादी विकून येत्या काही दिवसांत 10 अब्ज डॉलर्सपर्यंतचा निधी जमा करू शकते.
इतर महत्त्वाच्या बातम्या: