बॉलिवूडमध्येही क्रिप्टोकरन्सीचा दणक्यात प्रवेश, अमिताभ बच्चन Coin DCX चे ब्रँड अँबेसेडर
बिग बी अमिताभ बच्चन यांनी सर्वात आधी आपलं NFT (नॉन फंजीबल टोकन) लाँच केलं होतं. त्यानंतर सलमान खान आणि रणवीर सिंह यांनीही आपलं NFT (नॉन फंजीबल टोकन) लाँच केलं.
क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांना भारतात कायदेशीर मान्यता नाही, तरीही देशभरात या आभासी चलनाची क्रेझ वाढत आहे. क्रिप्टोकरन्सीच्या मोहापासून बॉलिवूड कलाकारही दूर राहू शकले नाहीत. अमिताभ बच्चन यांनी सर्वात आधी आपलं NFT (नॉन फंजीबल टोकन) लाँच केलं होतं. त्यानंतर सलमान खान आणि रणवीर सिंह यांनीही आपलं NFT ( Non-Fungible Tokens - नॉन फंजीबल टोकन) लाँच केलं. यांच्याशिवाय आणखी इतर बॉलिवूड कलाकारही लवकरच आपला NFT लाँच करणार आहेत. आता Coin DCX चे ब्रँड अँबेसडर म्हणून बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कलाकारांनी या आभासी चलनामध्ये गुंतवणूक केल्यामुळे सर्वसामान्यांनीही आपला रस दाखवला आहे. अल्पावधीतच याला मोठा प्रतिसाद मिळाला. तासभरात कोट्यवधीच्या क्रिप्टोकरन्सी विकल्या गेल्याचा दावा कॉईन डीसीएक्सने केला आहे.
CoinDCX चे (किप्टोकरन्सी एक्सचेंज क्वाइन-डीसीएक्स) सहप्रवर्तक आणि मुख्य कार्यकारी आधिकारी सुमित गुप्ता म्हणाले की, ‘’अमिताभ बच्चन यांनी ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती स्वीकारली, हा एकप्रकारे आमचा सन्मानच आहे. ते स्वत: क्रिप्टो गुंतवणूकदार असून नुकतेच त्यांनी स्वत:चं NFT लाँच केलं. अमिताभ बच्चन क्रिप्टोकरन्सीमधील जाणकार आहेत. बच्चन यांच्यामुळे नवीन यूजरमध्ये क्रिप्टोकरन्सीविषयी विश्वासाहर्ता निर्माण करण्यास मदत होईल. नव्या यूजर्सला याचा मोठा फायदा होणार आहे. CoinDCX क्रिप्टोकरन्सीमधील विश्वासार्हता आणखी वाढेल. तसेच आमच्यासाठी एक मोठा ब्रँड तयार करण्यासही मदत होईल. क्रिप्टोकरन्सीकडे मोठे उद्योजक आणि सिने कलाकार, खेळाडू देखील आकर्षित झाले असल्याचं त्यांनी सांगितलं.
एनएफटी म्हणजे काय?
NFT (नॉन फंजीबल टोकन) ही डिजिटल मालमत्ता आहे. जी कला, संगीत, व्हिडिओ, व्हिडिओ गेम आणि फोटो यांचे प्रतिनिधित्व करते. विशिष्ट प्रकारच्या कोडच्या आधारावर याची खरेदी आणि विक्री केली जाते. पण याचे स्वत:चं असं स्पष्ट अस्तित्व नाही. खरेदीदार आणि विक्रेते सहसा एनएफटीच्या विक्री आणि खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यापार करतात. अमिताभ बच्चन यांच्यासह सलमान खान, रणवीर सिंह यांचे यांचे NFTs BollyCoin.com वर विक्रीसाठी असतील. डिजिटल संग्रहणीय वस्तूंचा लिलाव Ethereum blockchain वर केला जाईल. हे व्यासपीठ बॉलिवूड चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींचे NFT खरेदी करून त्यांचे प्रेम दाखवण्याचा एक वेगळा मार्ग आहे. दरम्यान, सध्याचं क्रिप्टोमार्केट हे 1.7 ट्रिलियन डॉलर्स इतकं मोठं आहे. या वर्षी क्रिप्टोकरन्सीच्या मार्केटच्या मूल्यामध्ये 200 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Aa raha hoon main, NFTs leke. Salman Khan Static NFTs coming on @bollycoin. Stay tuned, bhai log! https://t.co/auNNbccZJX #BollyCoin #NFTs #ComingSoon pic.twitter.com/u8ZWUSwuq0
— Salman Khan (@BeingSalmanKhan) October 13, 2021
Cashaa चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार गौरव यांनी एबीपी माझाशी बोलताना बॉलिवूड कलाकारांमुळे क्रिप्टोकरन्सीला चांगले दिवस येतील असं म्हटलेय. बॉलिवूड कलाकारांच्या गुंतवणुकीमुळे भारतात क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठी उलाढाल होईल. अमिताभ बच्चन आणि सलमान खान बॉलिवूडमधील आघाडीचे कलाकार आहेत. त्यांचे भारतात लाखो चाहते आहेत. हे सर्व चाहते आपल्या आवडत्या कलाकारांचे नेहमीच अनुकरण करत असतात. सध्याचं 30,000 कोटींचं मार्केट एक लाख कोटींपर्यंत जाईल, असे कुमार गौरव म्हणाले.