रिलायन्स करणार मेटाव्हर्समध्ये प्रवेश, देशात असा प्रयोग करणारे मुकेश अंबानी पहिलेच
Mukesh Ambani : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी मेटाव्हर्समध्ये पाऊल ठेवणार आहे.
Mukesh Ambani : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी मेटाव्हर्समध्ये पाऊल ठेवणार आहे. व्हर्च्युअल स्पेसमध्ये पाऊल ठेवणारी रिलायन्स ही पहिलीच कंपनी ठरणार आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग हे मेटाव्हर्समध्ये उतरले होते. पण झुकरबर्ग यांचं मेटाव्हर्स होरायझन वर्ल्ड्स फ्लॉप झालं. महिन्याभरातच झुकरबर्ग यांच्या मेटाव्हर्सला युजर्सकडून प्रतिसाद मिळाला नाही. उलट टीकेची झोड उडाली. कमकुवत ग्राफिक्समुळे झुकरबर्गला ट्रोल करण्यात आलं. दुसरीकडे गुची (Gucci) आणि नाइके (Nike) यासारख्या ब्रँड्सना मेटाव्हर्सला युजर्सकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भारतीय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला स्वतःचे व्हर्च्युअल मार्केटप्लेस सुरू करण्यास प्रवृत्त केले जात आहे. भविष्यात फ्लिपकार्ट ही सेवा सुरु करण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतामधील रिलायन्स इंडस्ट्रीज मेटाव्हर्स तयार करत आहे. शेअरधारकांशी अधिक गुंतवणूक करण्यासाठी व्हर्च्युअल स्पेसद्वारे पर्याय मिळणार आहे.
मेटाव्हर्स तयार करण्यासाठी मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी नो-कोड GMetri मेटाव्हर्स या कंपनीसोबत भागिदारी करणार आहे. मेटाव्हर्स तयार झाल्यानंतर भागधारक कोणत्याही डिव्हाइसवरून यामध्ये प्रवेश करु शकतात. ग्रुपचे संयुक्त सीएफओ (CFO) आणि इतर परिणामांवर मेटाव्हर्समध्ये तासभर भाष्य करता येईल अथवा पाहता येऊ शकेल. व्हीआर हेडसेट न घालताही यूजर्स मेटावर्समधील कोणत्याही सत्रामध्ये सहभागी होऊ शकतात. स्टॉक खरेदीदार आणि विश्लेषक स्वत: मेटाव्हर्समध्ये थेट जाऊ शकतात आणि मुकेश अंबानी यांच्याकडून कोटेशन मिळवू शकतात. त्याशिवाय तज्ज्ञांकडून पीडीएफ फॉरमॅटमध्ये कोटेशन मिळवू शकतील.
‘मेटाव्हर्स’ म्हणजे नेमकं आहे तरी काय?
मेटाव्हर्स हा शब्द ऐकायला खूपच वेगळा आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर मेटाव्हर्स हे एक प्रकारचे आभासी जग आहे. या तंत्रानं तुम्ही आभासी ओळखीद्वारे डिजिटल जगात प्रवेश करू शकतात. हे एक वेगळं जग असून येथे तुमची वेगळी ओळख असेल. या डिजीटल जगात, तुम्हाला फिरण्याची, खरेदी करण्याची आणि मित्रांना भेटण्याची संधी देखील मिळते. मेटाव्हर्स ऑगमेंटेड रिअॅलिटी, व्हर्च्युअल रिअॅलिटी, मशीन लर्निंग, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या अनेक तंत्रज्ञानाची जोड देऊन कार्य करते. मेटाव्हर्स ही संकल्पना नवीन नाही. याची रचना तीन दशकांपूर्वी 1992 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर अमेरिकन सायन्स फिक्शन लेखक निया स्टीफन्सन यांनी त्यांच्या 'स्नो क्रश' या कादंबरीत मेटाव्हर्सचे वर्णन केलं होतं. या तीस वर्षांत हळूहळू या तंत्रज्ञानात उद्योगानं प्रगती केली. सध्या काहीच लोक मेटाव्हर्स वापरत आहेत. लवकरच सर्वांना मेटाव्हर्स वापरता येईल, अशी अपेक्षा केली जात आहे. ज्यामुळं प्रत्येकाला नव्या जगाचा अनुभव घेता येईल. याद्वारे तुम्हाला अभासी जगात प्रवेश करता येणार आहे. जर, तुम्हला व्हर्च्युअल टूर दरम्यान वाटेत शोरूम दिसल्यास तुम्ही तिथे खेरदी देखील करू शकता. येथे खरेदी केलेली वस्तू प्रत्यक्षात तुम्ही दिलेल्या पत्त्यावर येतील.