CNG PNG Price: आनंदवार्ता! सीएनजी-पीएनजीच्या दरात मोठी कपात, महानगर गॅसने जाहीर केले नवे दर
CNG PNG Price: मुंबई आणि जवळपासच्या क्षेत्रात सीएनजी, पीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या महानगर गॅसने सीएनजी पीएनजी गॅसच्या दरात कपात केली आहे.
CNG PNG Price: महागाईच्या तीव्र झळा सोसत असलेल्या नागरिकांसाठी चांगली बातमी आहे. महानगर गॅसने सीएनजी (CNG Price) आणि पीएनजीच्या (PNG Price) दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने सीएनजी गॅसचा दर निश्चित केल्यानंतर महानगर गॅस लिमिटेडने (MGL) काही तासांतच सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 8 रुपयांची कपात करण्याची घोषणा केली आहे. त्याशिवाय, स्वयंपाकांसाठी वापरण्यात येणारा पीएनजी गॅसच्या दरात 5 पाच रुपये प्रति एससीएमची (स्टॅंडर्ड क्युबिक मीटर) कपात करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून, 8 एप्रिलपासून हे नवे दर लागू होणार आहेत. (CNG and PNG Price Reduce in Mumbai and MMR Region) केंद्र सरकारने गॅस दराबाबत पारेख समितीच्या शिफारसी स्विकारल्यानंतर ही दर कपात लागू झाली आहे.
मुंबई आणि जवळील परिसरात महानगर गॅस लिमिटेड ही कंपनी प्रमुख सीएनजी, पीएनजी गॅस वितरक आहे. त्यामुळे सीएनजी गॅसच्या दर कपातीचा मोठा फायदा कार चालकांपासून ते रिक्षा चालकांनादेखील होणार आहे. सीएनजीच्या दरवाढीमुळे अनेकांचे बजेट बिघडले होते. या दरकपातीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
मुंबईत आणि परिसरात सीएनजी पीएनजीचा नवा दर किती?
मुंबई आणि आसपासच्या शहरात सीएनजीच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. 8 एप्रिलपासून महानगर गॅस लिमिटेडकडून वितरीत होणाऱ्या सीएनजीचा दर प्रति किलो 79 रुपये असणार आहे. तर, पीएनजीचा दर 49 रुपये प्रति SCM इतके असणार आहे.
केंद्र सरकारकडून सीएनजीचे दर जाहीर
केंद्र सरकारने पारेख समितीच्या शिफारसी स्विकारल्यानंतर आज सीएनजी गॅसचे दर जाहीर केले. एप्रिल महिन्यासाठी 7.92 डॉलर प्रति MMBtu इतकी निश्चित करण्यात आली आहे. ग्राहकांसाठी हे दर 6.5 डॉलर इतके असणार आहे.
Govt announces natural gas price of $7.92/MMBtu for April as per new pricing formula; price however capped at $6.5 for consumers: order
— Press Trust of India (@PTI_News) April 7, 2023
पेट्रोल-डिझेल, पीएनजीच्या तुलनेत सीएनजी स्वस्त
पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत आता सीएनजी आणि पीएनजी स्वस्त झाला असल्याचे महानगर गॅसने म्हटले आहे. पेट्रोलच्या तुलनेत 49 टक्के आणि डिझेलच्या तुलनेत 16 टक्के सीएनजी स्वस्त असल्याचे महानगर गॅसने म्हटले आहे. तर, एलपीजीच्या तुलनेत पीएनजीचा दर हा 21 टक्क्यांनी स्वस्त आहे.
फेब्रुवारीमध्येही झाली होती कपात
फेब्रुवारी महिन्यातही महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात केली होती. सीएनजीच्या दरात (CNG Price ) प्रतिकिलो 2.50 रुपयांची कपात करण्यात आली होती.