CNG आणि PNG म्हणजे काय? दोन्ही गॅसमधील फरक काय?
CNG-PNG : सीएनजी, पीएनजीच्या दरात किमान 10 टक्क्यांची कपात होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पण सीएनजी आणि पीएनजी म्हणजे नेमकं काय, यामध्ये फरक कोणता हे जाणून घेऊया.
CNG-PNG : केंद्र सरकारने किरीट पारेख समितीच्या गॅसच्या किमतींबाबतच्या शिफारशी मंजूर केल्या आहेत. सरकारने घरगुती नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्याच्या नव्या सूत्राला मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सीएनजी आणि पीएनजीसारख्या इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. सीएनजी, पीएनजीच्या दरात किमान 10 टक्क्यांची कपात होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पण सीएनजी आणि पीएनजी म्हणजे नेमकं काय, यामध्ये फरक कोणता हे जाणून घेऊया.
PNG म्हणजे काय?
PNG चा फूलफॉर्म "पाईप्ड नॅचरल गॅस" आहे. हा नैसर्गिक वायू आहे जो ग्राहकांच्या वापरासाठी वापरला जातो. हा नैसर्गिक वायू पाईपद्वारे उद्योग किंवा घरांमध्ये पोहोचवला जातो. त्याचा दाब 4 बार ते 21 मिली बारपर्यंत असतो. पीएनजीचा दाब हा ग्राहक वापरत असलेल्या बर्नरच्या प्रकारावर अवलंबून असतो. जर हा वायू घरासाठी वापरला असेल, तर त्याचा दाब 21 mbar असतो आणि जर तो कोणत्याही उद्योगात वापरला जात असेल तर त्याचा दाब त्यापेक्षा जास्त असतो परंतु 4 बारपेक्षा कमी असतो.
PNG घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी वापरला जातो. PNG नैसर्गिक वायू हे सुरक्षित इंधन आहे. PNG गॅस घरगुती गॅस (LPG) पेक्षा 30 टक्के स्वस्त आहे. PNG 515 टक्के हवेत पसरल्यावर आग लागते, तर LPG हवेत 2 टक्के किंवा त्याहून अधिक पसरले तरी आग लागते.
CNG म्हणजे काय?
सीएनजीचे पूर्ण नाव "कंप्रेस्ड नॅचरल गॅस" आहे. हा देखील नैसर्गिक वायू आहे, परंतु तो उच्च दाबाने (200 बार पर्यंत) कम्प्रेस्ड केला जाते. सीएनजीचा वापर वाहनांसाठी केला जातो. वाहनांमध्ये इंधनाऐवजी सीएनजी वापरला जातो. सिलेंडरमध्ये अधिकाधिक वायू साठवून त्याचा दीर्घ कालावधीसाठी वापर करणे हा गॅस कम्प्रेस करण्याचा मुख्य उद्देश आहे.
PNG आणि CNG मधील फरक
दरम्यान पीएनजी आणि सीएनची हे दोन्ही नैसर्गिक वायू असले तर या दोघांमध्ये काहीसा फरक आहे. सीएनजी म्हणजेच कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आहे आणि पीएनजी म्हणजे पाईप्ड नॅचरल गॅस. सीएनजी आणि पीएनजी दोन्ही नैसर्गिक वायू आहेत. मात्र सीएनजी वापरण्यासाठी 200 बारपर्यंत योग्य दाब आवश्यक आहे तर पीएनजीसाठी 4 बार ते 21 मिली बारपर्यंत दाब आवश्यक असतो.
LPG म्हणजे काय?
एलपीजीचा फुलफॉर्म लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस असा आहे. हा वायू प्रोपेन, प्रोपलीन, ब्युटेन आणि ब्यूटिलीन यांसारख्या अनेक वायूंचे मिश्रण आहे. हे पेट्रोलियम शुद्धीकरणाचे उप-उत्पादन म्हणून एलपीजी तयार केला जातो. एलपीजी हा नैसर्गिक वायूपेक्षा वेगळा असतो. एलपीजी हवेपेक्षा जड असतो.
या गॅसचा वापर स्वयंपाकासाठी, वाहनांसाठी इंधन म्हणून आणि मोटर चालवण्यासाठी केला जातो.