LIC : एलआयसीनं फक्त 5 दिवसात 60000 कोटी कमावले, रिलायन्स अन् टीसीएस देखील पिछाडीवर; एलआयसीचे गुंतवणूकदार मालामाल
Share Market News : शेअर बाजारात 26 ते 30 मे दरम्यान शेअर बाजारात तेजी आणि घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजारात घसरण सुरु असली तरी एलआयसीनं जोरदार कमाई केली.

मुंबई : भारतीय शेअर बाजारात 26 मे ते 30 मे या कालवाधीत तेजी आणि घसरण पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सेन्सेक्सच्या टॉप 10 कंपन्यांपैकी चार कंपन्यांनी नफा कमावला तर 6 कंपन्यांना नुकसान सहन करावं लागले. या दरम्यान भारतातील विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी एलआयसीनं पाच दिवसात 60000 कोटी रुपयांची कमाई केली. तर रिलायन्स आणि टीसीएस सारख्या कंपन्यांना नुकसान सहन करावं लागलं.
गेल्या आठवड्यात सेन्सेक्समध्ये 270.07 अंकांची घसरण झाली. या पाच दिवसात चार कंपन्यांनी एकत्रितपणे 1.01 लाख कोटींची कमाई केली. यात एलआयसी, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आणि बजाज फायनान्स या सारख्या कंपन्यांना नुकसान सहन करावं लागलं.
LIC च्या शेअरमध्ये या आठवड्यात 9.94 टक्क्यांची तेजी आली आहे. गेल्या पाच दिवसात एलआयसीचं बाजारमूल्य वाढलं. एलआयसीचं बाजारमूल्य 6,03,120.16 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. या नुसार एलआयसीच्या गुंतवणूकदारांनी पाच दिवसात 59233.61 कोटी रुपये कमावले.
स्टेट बँक, एचडीएफसी बँक फायद्यात
एलआयसी शिवाय इतर तीन कंपन्यांनी देखील दमदार कमाई केली. स्टेट बँक ऑफ इंडियाचं बाजारमूल्य 19589.54 कोटी रुपयांनी वाढून ते 725036.13 कोटी रुपये झाली आहे. भारती एअरटेलचं बाजारमूल्य 14082.2 कोटी रुपयांनी वाढून 1058766.92 कोटी रुपयांवर पोहोचलं. एचडीएफसी बँकेचं बाजारमूल्य 8462.15 कोटी रुपयांनी वाढून 1489185.62 कोटी रुपयांवर पोहोचलं.
एकीकडे एलआयसीनं पाच दिवसात 60 हजार कोटी रुपयांची कमाई केली असली तरी दुसरीकडे रिलायन्स, टीसीएस आणि इतर सहा कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं. टाटा ग्रुपच्या टीसीएसचं बाजारमूल्य 17909.53 कोटी रुपयांनी घसरुन 1253486.42 कोटी रुपये झालं. रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य 7645.85 कोटी रुपयांनी घसरुन 1922693.71 कोटी रुपये झालं.
बजाज फायनान्सचं बाजरमूल्य 4061.05 कोटी रुपयांनी घसरुन 570146.49 कोटी रुपये झालं. तर, आयसीआयसीआय बँक मार्केट कॅप 2605 कोटींनी घसरुन 1031262.20 कोटी रुपये इतकं झालं. याशिवाय हिंदूस्तान यूनिलीवरचं बाजारमूल्य 1973.66 कोटी रुपयांनी घसरुन 552001.22 कोटी रुपये झालं. इन्फोसिसचं बाजारमूल्य 656.45 कोटी रुपयांनी घसरुन 649220.46 कोटी रुपये झालं.
दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजचं नुकसान झालं असलं तरी बाजारमूल्यानुसार स्टॉक मार्केटमध्ये ते पहिल्या स्थानावर आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


















