फक्त 20-30 हजार खर्च आणि 4-5 लाख उत्पन्न, लाखोंचा फायदा देणारी गवती चहाची शेती
पंतप्रधान मोदींनी एकदा मन की बातमध्ये म्हटले होते की, शेतकरी केवळ गवती चहाच्या लागवडीने स्वतःला सक्षम करत नाहीत, तर ते देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देत आहेत.
मुंबई : कोरोना संकटात सर्वांना हे चांगलच कळालंय की खासगी नोकरी कधीही जाऊ शकतो. त्यामुळे आपला स्वत:चा व्यवसाय असणे कधीही फायद्याचं ठरु शकेल. अनेकांना व्यवसाय करायचाय पण कोणता व्यवसाय करावा हा प्रश्न पडतो. त्यामुळे शेती देखील चांगलं उत्पन्न देणारा व्यवसाय ठरु शकतो. मात्र शेतीत कोणतं पिक कधी घेणार हे महत्त्वाचं असतं. गवती चहाची (Lemon Grass) शेती सध्या फायदेशीर ठरु शकते. अवघे 20-30 हजार गुंतवणूक करुन लाखो रुपये यातून कमवता येऊ शकतात.
गवती चहाच्या शेती व्यवसायाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातमध्येही उल्लेख केला होता. पंतप्रधान मोदींनी एकदा मन की बातमध्ये म्हटले होते की, शेतकरी केवळ गवती चहाच्या लागवडीने स्वतःला सक्षम करत नाहीत, तर ते देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देत आहेत.
बाजारात गवती चहाला मोठी मागणी
गवती चहापासून काढलेल्या तेलाला बाजारात मोठी मागणी आहे. गवती चहामधून काढलेले तेल सौंदर्यप्रसाधने, साबण, तेल आणि औषधे बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये वापरतात. यामुळेच याला बाजारात चांगली किंमत मिळते. या पिकाची महत्वाची गोष्ट म्हणजे दुष्काळग्रस्त भागात सुद्धा याची चांगली लागवड करता येते. गवती चहाच्या लागवडीमुळे तुम्ही एका हेक्टरमधून वर्षाला 4 लाख रुपयांपर्यंत नफा कमवू शकता. विशेषमध्ये गवती चहाच्या शेतीमध्ये खतांची गरज लागत नाही, तसेच वन्य प्राण्यांपासून हे पिक नष्ट करण्याची भीती नाही. एकदा पीक पेरले की ते 5-6 वर्षे सतत सुरु राहते.
फेब्रुवारी ते जुलै दरम्यान गवती चहा लागवड करण्याचा सर्वोत्तम काळ आहे. एकदा लागवड केल्यानंतर सहा ते सात वेळा कापणी याची केली जाते. वर्षातून तीन ते चार वेळा कापणी केली जाते. गवती चहा लागवडीनंतर 3 ते 5 महिन्यांनी त्यांची पहिली कापणी केली जाते. गवती चहा तयार आहे की नाही जाणून घेण्यासाठी तो तोडा आणि त्याचा वास घ्या. जर तुम्हाला लिंबाचा तीव्र वास येत असेल तर समजून घ्या की हे गवत तयार आहे. याची जमिनीपासून 5 ते 8 इंच वर कापणी केली जाते.
किती उत्पन्न मिळते
जर तुम्ही एका हेक्टरमध्ये गवती चहाची लागवड केली तर सुरुवातीला 20,000 ते 40,000 रुपये खर्च येईल. एकदा पीक लागवड केल्यानंतर, वर्षातून 3 ते 4 वेळा कापणी करता येते. जर एका टनापासून 5 लिटर तेल तयार झाले तर एका वर्षात सुमारे 325 लिटर तेल एका हेक्टरमधून मिळते. तेलाची किंमत सुमारे 1200-1500 रुपये प्रति लिटर आहे. म्हणजेच 4 लाख ते 5 लाख रुपये सहज मिळवता येतात.