सरकार देणार दरमहा 3000 रुपये; नोव्हेंबर महिन्यात 46 लाखजणांनी केली नोंदणी, जाणून घ्या योजना
Pradhan Mantri Shram Yogi Maan-dhan Yojana: केंद्र सरकारच्या या योजनेनुसार, वयाच्या 60 व्या वर्षापासून दरमहा तीन हजार रुपये मिळणार आहेत.
Pradhan Mantri Shram Yogi Maan-dhan Yojana: केंद्र सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात, ज्या अंतर्गत शेतकरी, मजूर, असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक आणि गरीबांना आर्थिक मदत दिली जाते. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजना (PM-SYM) यापैकी एक आहे. या योजनेंतर्गत असंघटित क्षेत्रातील सुमारे 46 लाख कामगारांनी नोंदणी केली आहे. कामगार मंत्रालयाने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे.
2019 मध्ये सुरू झाली योजना
मासिक पेन्शनच्या स्वरूपात वृद्धावस्थेत सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने सरकारने 2019 मध्ये प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना वयाच्या 60 वर्षांनंतर किमान 3000 रुपये मासिक पेन्शन दिली जाईल.
25 नोव्हेंबरपर्यंत सुमारे 46 लाख लोकांनी नोंदणी
कामगार मंत्रालयाच्या माहितीनुसार, 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत, असंघटित क्षेत्रातील एकूण 45,77,295 कामगारांनी योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे.
दरमहा तीन हजार रुपये मिळणार
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PMSMY) मध्ये, तुम्ही दररोज फक्त 2 रुपये गुंतवून वृद्धापकाळात 3000 रुपये मासिक पेन्शन मिळवू शकता. तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षापासून पेन्शनचा लाभ मिळू लागतो. या योजनेअंतर्गत वृद्धापकाळात खर्चासाठी काही रक्कम सुरक्षित करू शकता.
18 व्या वर्षापासून करू शकता गुंतवणूक
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत व्यक्ती त्यांच्या वयानुसार गुंतवणूक करू शकतात. जर तो 18 वर्षांचा असेल तर त्याला दरमहा 55 रुपये गुंतवावे लागतील. 19 वर्षे वयोगटातील लोकांना दरमहा 100 रुपये आणि 40 वर्षे वयाच्या लोकांना दरमहा 200 रुपये गुंतवावे लागतील. निवृत्ती वेतन सेवा सुरू होण्यापूर्वी लाभार्थीचा मृत्यू झाल्यास त्याच्या/तिच्या जोडीदाराला पेन्शनच्या रकमेच्या 50 टक्के रक्कम मिळेल.
योजना कोणासाठी फायदेशीर आहे?
ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी महत्त्वाची आहे. कामगार, वाहन चालक, घरकाम करणारे, रिक्षा चालक, फेरीवाले, आदी लोकांसाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते. सरकारी आकडेवारीनुसार, भारतात असंघटित क्षेत्रात सुमारे 42 कोटी लोक काम करतात.