Jio Financial Services Q2 Earnings: जिओ 'धन धना धन'; मुकेश अंबानींच्या कंपनीची कमाल, बाजारात एन्ट्री घेताच धमाल; दुप्पट नफा, शेअर्सही सुसाट
Jio Financial Services Share Rise : मुकेश अंबानींची ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजपासून विभक्त होऊन याच वर्षी अस्तित्वात आली आणि 21 ऑगस्ट 2023 रोजी तिचे शेअर्स मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले. तो बीएसईवर 265 रुपयांवर लिस्ट झाला होता.
Jio Financial Services Q2 Earnings: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स ग्रुपची नवी कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसनं (Jio Financial Services) स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट करून सर्वांना आश्चर्यचकीत करणारी कामगिरी केली आहे. कंपनीनं या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या कालावधीत कंपनीचा नफा 101 टक्क्यांनी वाढून 668 कोटी रुपयांवर पोहोचल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. यासोबतच कंपनीच्या उत्पन्नातही मोठी वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट नफा
रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसनं (Jio Financial Services) दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना सांगितलं की, कंपनीचा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजपासून वेगळं होण्यापूर्वी आणि नवीन कंपनी स्थापन करण्यापूर्वी, गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या कर भरल्यानंतरचा एकत्रित नफा 371 कोटी रुपये होता, जो यावेळी 668 कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. त्यानुसार पाहिल्यास कंपनीनं नफ्यात 101 टक्के वाढ नोंदवली आहे.
उत्पन्नात 46 टक्क्यांहून अधिक वाढ
तिमाही निकालांनुसार, गेल्या तिमाहीत कंपनीचं उत्पन्न 608 कोटी रुपये नोंदवलं गेलं होतं, जे मागील वर्षी याच तिमाहीत 414 कोटी रुपये होतं. यामध्ये यंदा 46.82 टक्के वाढ झाली आहे. याउलट, कंपनीला व्याजातून मिळणारं उत्पन्न (Jio Fin Interest Income) 7.86 टक्क्यांनी घसरून 186 कोटी रुपये झालं आहे. प्री-प्रोव्हिजनिंग ऑपरेटिंग नफा 48.93 टक्क्यांनी वाढून 360 कोटींवरून थेट 537 कोटींवर पोहोचला आहे.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचं ऑगस्टमध्येच बाजारात झालेलं लिस्टिंग
महत्त्वाची बाब म्हणजे, जुलै-सप्टेंबर तिमाहीपर्यंत कंपनीचं एकूण मार्केट कॅप 1.43 लाख कोटी रुपये होतं, जे आता आणखी वाढून 1.45 लाख कोटी रुपये झालं आहे. मुकेश अंबानी यांची ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजपासून विभक्त होऊन या वर्षीच अस्तित्वात आली. तसेच, तिचे शेअर्स 21 ऑगस्ट 2023 रोजी शेअर मार्केटमध्ये (Share Market) लिस्ट झाले होते. जिओ फायनान्शिअल लिमिटेडचा शेअर (Jio Financial Ltd Share) बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर 265 रुपये आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर 262 रुपयांवर लिस्ट झाला होता.
जिओ फायनान्शिअलचे शेअर्स बाजारात सुसाट
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या जोरदार कामगिरीनंतर त्यांचे शेअर्सही वधारल्याचं पाहायला मिळालं. आठवड्याचा दुसरा व्यवहाराचा दिवस, म्हणजेच, मंगळवारी सेन्सेक्स (Sensex) - निफ्टी (Nifty) हिरव्या चिन्हावर वाढीसह उघडले, तर जिओ फायनान्सचे शेअर्सही (Jio Financial Share) बाजारात सुसाट व्यवहार करताना दिसले. सकाळी 10 वाजता कंपनीचा शेअर 1.07 टक्क्यांच्या वाढीसह 227.20 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. याआधीच्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारीही शेअर्समध्ये वाढ दिसली होती.