पैशासाठी कोणाकडे हात पसरु नका, खात्यात झिरो बॅलन्स असतानाही बँक देते 10000 रुपये; जाणून घ्या प्रक्रिया
तुम्हाला गरज पडल्यास बँकेतून कधीही 10,000 रुपये मिळू शकतात. याची नेमकी प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊयात.
Zero Balance Account: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सुरु केलेल्या जन धन योजनेने (jandhan scheme) दुर्गम ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना बँकिंग सेवांशी जोडण्यात मदत केली होती. झिरो बॅलन्सवर चालणाऱ्या या खात्यामुळे कोट्यवधी लोकांना बचत खाते, विमा आणि पेन्शन यासारखे फायदे सहज मिळण्यास मदत झाली. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) ची उद्दिष्टे पूर्ण करण्यात या योजनेने पूर्ण भूमिका बजावली. जन धन खात्याच्या सर्व वैशिष्ट्यांबद्दल फार लोकांना माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला या खात्याच्या अशाच एका सुविधेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला गरज पडल्यास कधीही 10,000 रुपये मिळू शकतात.
झिरो बॅलन्स अकाउंट ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊ शकता
जन धन खात्यामध्ये खातेधारकांना 10,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते. खातेधारक या शून्य-शिल्लक खात्यात कधीही ओव्हरड्राफ्ट (OD) किंवा रु 10,000 पर्यंत क्रेडिट घेऊ शकतात. यापूर्वी ओव्हरड्राफ्ट मर्यादा 5,000 रुपये होती. आता ते 10,000 रुपये करण्यात आले आहे. गरज भासल्यास तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.
ओव्हरड्राफ्टवर व्याज आकारले जाते
ओव्हरड्राफ्ट किंवा क्रेडिट सुविधेचा लाभ घेतल्यावर तुम्हाला बँकेला नाममात्र व्याज द्यावे लागेल. मात्र यातून अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांच्या किरकोळ गरजा सहज पूर्ण होतात. त्यांना कोणाकडे हात पसरावे लागत नाहीत. कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे आणि फाइल्स बनवण्याचा त्रास न घेता तुम्ही हे पैसे वापरू शकता.
ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय?
ओव्हरड्राफ्ट हा सहज कर्जाचा प्रकार आहे. या अंतर्गत, बँक ग्राहकांना विशिष्ट रक्कम कर्ज घेण्याची परवानगी देते. या कर्जावर बँक व्याजही आकारते. तुम्हाला ओव्हरड्राफ्टवर फी देखील भरावी लागेल.
या लोकांना मिळू शकतो लाभ
जर तुम्ही मूलभूत बचत खाते किमान सहा महिने चांगले चालवले असेल, तर तुम्हाला 10,000 रुपयांची ओडी सहज मिळू शकते. याशिवाय, कुटुंबातील कमावत्या सदस्यांना किंवा महिलांसाठी ओव्हरड्राफ्ट उपलब्ध आहे. यासाठी डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यात सतत पैसे येत राहणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचे खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असावे. तसेच, तुमचे जन धन खाते इतर कोठेही नसावे. अर्जदाराचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे.