Stock Market Update : आर्थिक सर्वेक्षण अहवालाचा परिणाम, सेन्सेक्समध्ये 1 हजार अंकांची वाढ, निफ्टीत 294 अंकांची उसळी
Stock Market Update : शेअर बाजार आज तेजीत आहे. सेन्सेक्समध्ये 1 हजारहून अधिक अंकांची उसळी पाहायला मिळत आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्हीमध्ये 1.7 टक्क्यांची उसळी दिसून येत आहे.
Stock Market Update : लोकसभेत आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. पुढील आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 8 ते 8.50 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अर्थ मंत्री निर्मला सीतारामण यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल लोकसभेच्या पटलावर मांडला. आर्थिक सर्वेक्षण अहवालानंतर सेन्सेक्स एक हजार अंकांनी वधारला तर निफ्टी देखील 294 अंकांनी वाढला आहे.
सध्या शेअर बाजार तेजीत असून सेन्सेक्समध्ये 1 हजारहून अधिक अंकांची उसळी पाहायला मिळत आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्हीमध्ये 1.7 टक्क्यांची उसळी दिसून येत आहे. अर्थसंकल्पामुळे शेअर बाजारावर आज दिवसभर गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे. आज सकाळी सव्वा बाराच्या दरम्यान सेन्सेक्स 1020.22 अंकांनी वाढून 58 हजार 220.45 वर पोहोचला तर निफ्टी 296.30 अंकांनी वाढून 17 हजार 398.25 वर पोहोचला.
सध्या निफ्टीच्या 45 शेअर्समध्ये वाढ होत आहे. आयटी, बँकिंग आणि फार्मा शेअर्सच्या वाढीमुळे निफ्टी 17,406 च्या वर पोहोचला. तर बँक निफ्टी 37 हजार 996 वर व्यवहार करत आहे. रिअॅल्टी क्षेत्रात 2.63 टक्के आणि पीएसयू बँक क्षेत्रात 2.14 टक्क्यांनी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यासोबतच आयटी क्षेत्रात सर्वाधिक 2.88 टक्क्यांची वाढ झाली.
आज शेअर बाजार सुरू झाल्यानंतर टेक महिंद्रा 4.5 टक्क्यांनी वाढला तर बीपीसीएल 3.57 आणि विप्रोचा शेअर्स 3.24 टक्के वाढला. याबरोबरच इन्फोसिस 3 टक्के आणि डॉ. रेड्डीज लॅब्स 2.9 टक्क्यांनी वाढला आहे. तर इंडसइंड बँक 3.70 टक्के आणि कोटक बँकेचे शेअर्स 2.47 टक्क्यांनी घसरले आहेत. UPL 0.80 टक्क्यांनी आणि HDFC लाइफ 0.20 टक्क्यांनी घसरला आहे. शिवाय कोल इंडियामध्ये 0.19 टक्के कमजोरी असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आज मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून वाढत्या कच्च्या तेलाच्या भावामुळे महागाई वाढण्यावर सरकारकडून चिंता व्यक्त केली आहे. असे असले तरी महागाईचा दर नियंत्रणात राहण्याचा सरकारचा अंदाज आहे. यासोबतच बॅंकिंग क्षेत्राची स्थिती मजबूत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. सरकारी कर्ज कमी होण्याचा देखील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्वांच्या परिणामामुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली. याबरोबरच उद्या केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाणार असल्यामुळेही आज बाजारात चांगली स्थिती पाहायला मिळाली.
महत्वाच्या बातम्या
- Economic Survey 2022: : लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर; पुढील वर्षी जीडीपी दर 8-8.50 टक्के राहण्याचा अंदाज
- Budget 2022 : 2022 च्या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांच्या काय आहेत अपेक्षा?
- Budget 2022 on App: इंग्रजी किंवा हिंदीत वाचू शकाल अर्थसंकल्प; केंद्र सरकारने लॉन्च केलं अॅप
- Budget 2022: अर्थसंकल्प 2022 पासून ऑटोमोबाईल क्षेत्राच्या अपेक्षा काय, गाडी घेणं स्वस्त होणार का?