LIC IPO: पॉलिसीधारक आहात? LIC चे शेअर मिळवण्यासाठी वापरा 'ही' पद्धत
LIC IPO Updates : तुम्ही एलआयसी कर्मचारी, पॉलिसीधारक आहात तर तुम्हाला आयपीओसाठी अधिकाधिक लॉटसाठी बोली लावावी असे तज्ज्ञांंनी सूचवले आहे.
LIC IPO Updates : देशातील सर्वात मोठा आयपीओ असलेला एलआयसीचा आयपीओ खुला झाला आहे. एलआयसीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. विमा पॉलिसीधारक, एलआयसी कर्मचारी आणि किरकोळ गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. एलआयसीच्या आयपीओसाठी एलआयसी पॉलिसीधारक आणि कर्मचाऱ्यांना राखीव कोटा आहे. पॉलिसीधारक आणि कर्मचाऱ्यांनी शक्य होईल तेवढ्या लॉटसाठी बोली लावण्याची सूचना तज्ज्ञांनी केली आहे. याचे खास कारणही त्यांनी सांगितले आहे.
पॉलिसीधारकांनी अधिकाधिक लॉटसाठी का प्रयत्न करावे?
शेअर बाजार विश्लेषकांनी पॉलिसीधारक आणि एलआयसी कर्मचारी या आरक्षित कोट्यातील गुंतवणूकदारांना अधिकाधिक लॉटच्या बोलीसाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहे. या आरक्षित कोट्यातील गुंतवणूकदारांनी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी असलेल्या विभागातून बोली न लावण्याची सूचना केली आहे. त्यांनी सांगितले की, किरकोळ गुंतवणूकदारांच्या कोट्यातून शेअर अलॉटमेंट देताना सोडतीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तर, राखीव कोट्यातून शेअर अलॉटमेंट हे आयपीओ बोली अर्जाच्या प्रमाणात देण्यात येणार आहेत.
पॉलिसीधारकांनी त्यांच्यासाठी आरक्षित असलेल्या विभागातून अर्ज दाखल केल्यास प्रति शेअर 90 रुपयांची सवलत मिळणार आहे. त्याशिवाय अधिकाधिक बोली लावल्यास आयपीओतून शेअर अलॉटमेंट होण्याची शक्यता अधिक निर्माण होईल. तर, किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर अलॉटमेंटमध्ये एक लॉट म्हणजे 15 शेअर्स मिळतील अथवा एकही शेअर मिळणार नाही.
पॉलिसीधारकांकडून आयपीओसाठी उदंड प्रतिसाद
आयपीओमध्ये एलआयसी पॉलिसीधारकांसाठी 2.21 कोटी शेअर्स राखीव ठेवले आहेत. त्या तुलनेत आयपीओ खुला झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी 6.44 कोटींच्या शेअरसाठी बोली लावण्यात आली आहे. तर, कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या 15.81 लाख शेअर्ससाठी 32.67 लाख शेअर्सची बोली लागली आहे. तर, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी असलेल्या 6.91 कोटी शेअरसाठी आतापर्यंत 6.7 कोटींच्या शेअरची बोली लागली आहे.
तर दुसऱ्या दिवसापर्यंत, बिगर-संस्थात्मक गुंतवणूदारांसाठी असलेल्या 2.96 कोटी शेअरच्या तुलनेत 1.32 कोटी शेअरसाठी बोली लागली आहे. येत्या 9 मे पर्यंत एलआयसी आयपीओसाठी बोली लावता येणार आहे.