IPO: रुस्तमजीच्या 'कीस्टोन रिअल्टर्स'चा 635 कोटींचा आयपीओ 14 नोव्हेंबरला बाजारात
Rustomjee Group: कंपनीने आयपीओसाठी 514-541 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला असून त्या माध्यमातून 635 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे.
मुंबई: 'रुस्तमजी' ब्रँड अंतर्गत मालमत्तेची विक्री करणाऱ्या मुंबईमध्ये असणाऱ्या कीस्टोन रिअल्टर्सचा आयपीओ अखेर बाजारात आला आहे. हा आयपीओ 14 नोव्हेंबर रोजी उघडणार आहे. गुंतवणूकदार 16 नोव्हेंबरपर्यंत या आयपीओचे सदस्यत्व घेऊ शकतात. कंपनीने आयपीओसाठी बुधवारी म्हणजेच 9 नोव्हेंबर रोजी 514-541 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. 635 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. या आयपीओचा आकार कमी करण्यात आला आहे. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी कंपनीच्या तपशीलासह आयपीओचेही तपाशील पाहा.
आयपीओचा आकार कमी
तुम्ही या आयपीओसाठी पैसे गुंतवू शकता. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) नुसार कंपनीची 635 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार या आयपीओचा आकार कमी करण्यात आला आहे. यापूर्वी कंपनीने 850 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली होती. अँकर गुंतवणूकदार 11 नोव्हेंबर रोजी शेअर्ससाठी बोली लावू शकतील.
नवीन इक्विटी शेअर्स आणि OFS
आयपीओमध्ये 560 कोटी रुपयांपर्यंत नवीन शेअर्स जारी केले जातील. त्याचवेळी 75 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत त्याचे भागधारक आणि प्रवर्तकांचे शेअर्स विकले जातील. कंपनीचे शेअर्स 24 नोव्हेंबर रोजी बीएसई आणि एनएसई या दोन्ही बाजारात सूचिबद्ध होतील.
प्रवर्तक बोमन रुस्तम इराणी आता OFS मध्ये 37.5 कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स विकणार आहेत. त्याच वेळी, त्यात पर्सी सोराबजी चौधरी आणि चंद्रेश दिनेश मेहता यांच्या 18.75 कोटी रुपयांच्या शेअर्सच्या विक्रीचाही समावेश आहे.
निधीचा वापर कुठे केला जाईल
कीस्टोन रिअल्टर्स आयपीओमधून 341.6 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरतील. त्याच वेळी, काही निधी भविष्यातील रिअल इस्टेट प्रकल्पांच्या संपादनासाठी वापरला जाईल. हा निधी सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरण्याची योजना आहे.
कंपनीचा व्यवसाय काय आहे?
Keystone Realtors कंपनी 1995 मध्ये सुरू झाली. कंपनीचे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) मध्ये अनेक पूर्ण झालेले आणि चालू असलेले प्रकल्प आहेत. यामध्ये परवडणाऱ्या, मिड आणि मास, एस्पिरेशनल, प्रीमियम आणि सुपर प्रीमियम श्रेणीतील प्रकल्पांच्या विस्तृत श्रेणीचा समावेश आहे. हे सर्व रुस्तमजी ब्रँड अंतर्गत येतात. याशिवाय, मुंबईस्थित रिअल इस्टेट डेव्हलपरने मार्च 2022 पर्यंत 20.05 दशलक्ष चौरस फूट उच्च मूल्याच्या आणि परवडणाऱ्या निवासी इमारती, प्रीमियम गेट इस्टेट, टाउनशिप, कॉर्पोरेट पार्क, किरकोळ जागा, शाळा, प्रतिष्ठित खुणा आणि इतर विविध रिअल इस्टेट प्रकल्प विकसित केले आहेत.