Digital Economy: डिजिटल परिवर्तनात भारत पुढे, अर्थव्यवस्थेला मोठा फायदा; एकूण GDP मध्ये होणार 20 टक्के योगदान
सध्या जगभरात सुरु असलेल्या डिजिटल परिवर्तनाच्या युगात देश खूप पुढे आहे. डिजिटल परिवर्तनाचा भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होत आहे.
Digital Economy: गेल्या काही वर्षांत भारत एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयास आला आहे. सध्या जगभरात सुरु असलेल्या डिजिटल परिवर्तनाच्या युगात देश खूप पुढे आहे. डिजिटल परिवर्तनाचा भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होत आहे. लवकरच एकूण जीडीपीमध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेचे योगदान 20 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
सर्वात वेगवान डिजिटल अर्थव्यवस्था
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, भारत ही केवळ जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था नाही तर भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी डिजिटल अर्थव्यवस्था असल्याचे चंद्रशेखर म्हणाले. दिल्लीत आयोजित डिजिटल एक्सलेरेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन एक्सपोमध्ये ते बोलत होते.
आतापर्यंत इतके योगदान दिले आहे. सध्या देशाच्या एकूण सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) डिजिटल अर्थव्यवस्थेचा वाटा 11 टक्के आहे. एकूण जीडीपीमध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेचे योगदान लवकरच 20 टक्क्यांपर्यंत म्हणजेच एक पंचमांश होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
काही दिवसांपूर्वी राजीव चंद्रशेखर यांनी एका कार्यक्रमात दावा केला होता की 2026 पर्यंत एकूण जीडीपीमध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेचे योगदान 20 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. तेव्हा त्यांनी सांगितले होते की 2014 मध्ये जीडीपीमध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेचे योगदान केवळ 4.5 टक्के होते, जे आता सुमारे 11 टक्के झाले आहे.
वाढीचा वेग खूप जास्त
राजीव चंद्रशेखर यांच्या मते, आजकाल डिजिटल अर्थव्यवस्था सामान्य अर्थव्यवस्थेपेक्षा कितीतरी पटीने जास्त वेगाने प्रगती करत आहे. व्यापक डिजिटल अर्थव्यवस्थेचा आणि विशेषत: नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्थेचा विकास दर उत्कृष्ट आहे. त्यांच्या वाढीचा वेग नियमित अर्थव्यवस्थेपेक्षा जवळपास 3 पट जास्त आहे.
2026 साठी ही उद्दिष्टे
भारताला 2027 पर्यंत 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासोबतच 2026 पर्यंत देशाला जगातील ट्रिलियन डॉलर डिजिटल अर्थव्यवस्थांपैकी एक बनवण्याचेही लक्ष्य असल्याचे मंत्री चंद्रशेखर म्हणाले. आपण जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्थाच नाही तर सर्वात वेगाने वाढणारी डिजिटल अर्थव्यवस्था देखील असल्याचे ते म्हणाले.