Edible Oil : महागाईचा भडका! भारतात खाद्यतेल पुन्हा महागणार
Russia Ukraine War : वाढत्या महागाईच्या दरम्यान देशात खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ होणार आहे. त्यामुळे जनतेच्या खिशाला कात्री लागणार असल्याचं दिसून येत आहे.
India Edible Oil Export : देशातील महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. भाज्यापासून ते इंधनापर्यंत सर्वच वस्तूंचे दर वाढताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरातही 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. अशात आता खाद्यतेलाच्या किमतीही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळेज जनतेला महागाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे तेलाच्या आयातीवर निर्बंध लागले आहेत. दुसरीकडे इंडोनेशियाकडून होणार पामतेलाचा पुरवठा ठप्प झाल्याने खाद्यातेलाच्या किंमतीत सतात वाढत आहे.
मॉस्कोकडून जूनपासून निर्यात शुल्कात वाढ
भारत सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील सवलतींसाठी रशियाशी संपर्क साधणार आहे. रशियाकडून भारताला होणारा खाद्यतेलाचा साठा मर्यादित आहे. रशियाने 1.5 दशलक्ष टन सूर्यफूल तेल निर्यातीचा कोटा लागू केला आहे. तसेच 31 ऑगस्टपर्यंत सूर्यफूल बियाण्यांच्या निर्यातीवरही बंदी घातली आहे. मॉस्कोने जूनपासून खाद्यतेलाच्या निर्यात शुल्कात वाढ केल्याची माहिती भारतीय आयातदारांनी सरकारला दिली आहे. आयात शुल्क वाढल्यामुळे खर्च आणखी वाढू शकतो आणि परिणामी खाद्यतेलाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
भारत रशियाशी संपर्क साधणार
सूर्यफूल तेलाच्या आयातीवर सवलत मिळवण्यासाठी भारत सरकार लवकरच रशियाशी चर्चा सुरू करण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईच्या दरम्यान खाद्यतेलाच्या देशांतर्गत किरकोळ किमती सतत वाढत आहेत. त्यामुळे किंमती अजून वाढू नये यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
रशियाने 31 ऑगस्टपर्यंत सूर्यफूल तेलाची निर्यात मर्यादित केली आहे. यानंतर खाद्यतेल आयातीसाठी रशिया भारताला दरात सवलत देईल अशी भारताला आशा आहे. रशियातील सूर्यफूल तेलाची निर्यात 31 ऑगस्टपर्यंत 1.5 दशलक्ष टनांवर मर्यादित आहे. तर या कालावधीत सूर्यफूल बियांच्या विदेशात विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. रशियाने सूर्यफूल खाद्यतेल निर्यातीसाठी 700,000 टन साठा आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'भारत आणि रशियामध्ये या संदर्भातील चर्चा अद्याप सुरु झालेली नाही. मात्र सर्व पर्याय खुले आहेत. यामुळे भारताला कमी शुल्क मिळण्याची अपेक्षा आहे.' इंडोनेशियामध्ये पाम तेलाचा तुटवडा निर्माण झाल्याने आणि वाढत्या महागाईमुळे देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमती ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचल्याने भारत रशियाकडून खाद्यतेल आयातीवर लक्ष केंद्रीत करत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :