Price Hike: तुमच्या ताटातली चपाती महागली; पिठाच्या किंमतीत वाढ
Atta Price Hike: गव्हाच्या पीठाच्या दरात वाढ झाली असून चपाती आणि पिठापासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Atta Price Hike: वाढत्या महागाईचा परिणाम थेट आता तुमच्या जेवणाच्या थाळीवर जाणवणार आहे. गव्हाच्या वाढत्या दरामुळे आता गव्हाच्या पिठात वाढ झाली आहे. रिटेल बाजारात गव्हाच्या पीठाचा सरासरी दर जवळपास 32.91 प्रति किलो इतका झाला आहे. मागील एका वर्षात पीठाच्या दरात 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी मे महिन्यात पिठाचा दर प्रति किलो 29.14 इतका होता.
ग्राहक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पिठाचा कमाल दर 59 रुपये प्रति किलो असून किमान दर 22 रुपये प्रति किलो आहे. 9 मे रोजी म्हैसूरमध्ये पिठाचा दर 54 रुपये प्रति किलो, मुंबईत 49 रुपये प्रति किलो, चेन्नईत 34 रुपये प्रति किलो, कोलकातामध्ये 29 रुपये प्रति किलो आणि दिल्लीत 27 रुपये प्रति किलो इतका दर सुरू आहे.
गव्हाचे उत्पादन घटण्याचा अंदाज
आगामी काळात गव्हांच्या किंमतीत मोठी होण्याची शक्यता आहे. वर्ष 2021-22 मध्ये रब्बीच्या हंगामात गव्हाच्या उत्पादनात घटण्याचा अंदाज आहे. सरकारने हा अंदाज व्यक्त केला आहे. या वर्षी उन्हाच्या झळा लवकरच बसू लागल्याने 111.32 दशलक्ष टन उत्पादनाऐवजी 105 दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला (FCI)गरज भासल्यास OMSS च्या माध्यमातून गव्हाची विक्री करतात. जेणेकरून बाजारपेठेत गव्हाचा पुरवठा कमी होता कामा नये. बाजारात गव्हाचा पुरवठा कमी झाल्यानंतर FCI कडून हे पाऊल उचलले जाते. FCI मुळे मागणी वाढली तरी गव्हाच्या किंमती या स्थिर राहण्यास मदत होते. त्यामुळे महागाईचा फटका बसत नाही. मात्र , अद्यापही सरकारकडून खुल्या बाजारात गहू विक्रीबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. खुल्या बाजारात गव्हाची विक्री करून सरकार मागणी आणि किंमती नियंत्रित करते. सरकारने याबाबत निर्णय न घेतल्यास जून महिन्यापासून गव्हाच्या पिठाच्या किंमती वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईची झळ आणखी तीव्रपणे जाणवण्याची शक्यता आहे.