(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BSNL Service Revenue : बीएसएनलच्या महसुलात घट होण्याचा संचालकांचा अंदाज, ही आहेत कारणे?
BSNL Service Revenue : सरकारी मालकीची कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेडला (BSNL) २०२१-२२ या आर्थिक वर्षात सेवांमधून 17,000 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत कमी आहे
BSNL Service Revenue : सरकारी मालकीची कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेडला (BSNL) २०२१-२२ या आर्थिक वर्षात सेवांमधून 17,000 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत कमी आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनं ही बातमी दिली आहे. बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पी के पुरवार यांनी ही माहिती दिली. महसुलातील ही घट प्रामुख्याने कॉल कनेक्ट शुल्क हटवल्यामुळे होईल असा त्यांनी अंदाज वर्तविला आहे.
4G अपेक्षित -
सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी बीएसएनएल आपल्या ग्राहकांचा विश्वास आणि आधार कायम ठेवेल आणि येत्या काही महिन्यांत सुरू होणार्या 4G सेवांवर आपली पकड कायम ठेवेल असं पुरवार यांनी सांगितलं. 5G सेवेसाठी खाजगी दूरसंचार कंपन्यांकडून तीव्र स्पर्धा असतानाही हे घडेल असा त्यांचा विश्वास आहे. खाजगी ऑपरेटर्सद्वारे 5G सेवा सुरू केल्याने बीएसएनलला लगेच त्रास होणार नाही, कारण नवीन सेवांसाठी उपकरणे अद्याप विकसित केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. सोबतच बीएसएनएलची 4जी सेवा सुरू करण्याची तयारी चांगल्या पद्धतीने सुरू आहे. बीएसएनलचे 2022 मध्ये 4G सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पुरवार म्हणाले
इंटरकनेक्ट वापर शुल्क काढल्याचा महसुलावर परिणाम -
“आम्ही आव्हाने असूनही आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये स्थिर महसूल (सेवांमधून, इतर उत्पन्न वगळता) राखण्यात सक्षम आहोत. 2020-21 या आर्थिक वर्षात सेवांमधून मिळालेल्या 17,452 कोटी रुपयांच्या उत्पन्नाविरुद्ध, या वर्षी आम्ही 17,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न गाठू असं पुरवार यांनी म्हटलंय. बीएसएनएलचा तोटा 2019-20 मध्ये 15,500 कोटी रुपये होता, जो 2020-21 मध्ये 7,441 कोटी रुपयांवर आला. बीएसएनएलच्या प्रमुखाने सांगितले की, "आम्ही चालू आर्थिक वर्षात गेल्या वर्षी प्रमाणेच नुकसानीची अपेक्षा करत आहोत."
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live