क्रेडिट कार्ड वापरताय? 'या' पाच गोष्टी टाळा, अन्यथा अडकू शकता कर्जाच्या विळख्यात!
क्रेडिट कार्डचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेदेखील आहेत. त्यामुळे या कार्डचा वापर करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. अन्यथा कर्जाच्या विळख्यात अडकण्याची भीती असते.
मुंबई : आजकाल क्रेडिट कार्डमुळे (Credit Card) सगळंकाही सोपं झालं आहे. क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्हाला पैसे वापरायला मिळतात. यासह क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड, कॅशबॅक, वेगवेगळ्या ऑफर असतात. मात्र क्रेडिट कार्डचा योग्य वापर केला तरत ते फायद्याचे ठरते. अन्यथा याच क्रेडिट कार्डमुळे डोकेदुखी वाढू शकते. क्रेडिट कार्डचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यसा तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो. तर याच कार्डचा चांगला आणि योग्य पद्धतीने वापर केल्यावर सीबील स्कोअर सुधारू शकतो. याच पार्श्वभूमीवर क्रेडिट कार्ड वापरताना कोणत्या पाच चुका करू नये हे जाणून घेऊ या..
किती पैसे खर्च करायचे हे लक्षात असू द्या
उत्पन्न कमी असल्यावर लोक सर्रास क्रेडिट कार्डचा वापर करून आपल्या गरजा भागवतात. मात्र तुमच्या क्रेडिट कार्डच्या एकूण लिमिटपेक्षा 30 टक्केच रक्कम वापरली पाहिजे. यापेक्षा जास्त पैसे खर्च करणे टाळावे. उदाहरणार्थ तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट ही एक लाख रुपये असेल तर त्यातील फक्त 30 हजार रुपयेच खर्च केले पाहिजेत. यापेक्षा जास्त पैसे खर्च केल्यास त्याचा परिणाम क्रेडिट युटिलायझेशन रेशोवर पडू शकतो.
ड्यू डेट चुकवू नये
तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर सर्व बील वेळेवर भरायला हवेत. हे बील देण्याची अंतिम तारीख म्हणजेच ड्यू डेट चुकवू नये. असे केल्यास भविष्यात जास्त पैसे द्यावे लागतात. त्याचा सीबीलवर परिणाम पडतो.
डिस्काऊंटच्या जाळ्यात फसून शॉपिंग करू नका
क्रेडिट कार्डवर वेगवेगळ्या ऑफर्स असतात. मात्र याच ऑफर आणि सवलतींच्या जाळ्यात फसून क्रेडिट कार्डचा वापर करू नये. फारच गरज पडल्यावर त्याचा वापर करावा. ऑफर्सला बळी पडून तुम्ही खरेदी करत राहिले तर कर्जाच्या जाळ्यात फसण्याची शक्यता जास्त आहे. कोणतीही वस्तू खरेदी करण्याआधी त्या वस्तूच्या किमतीची आपण परतफेड करू शकतो का? याचा विचार करावा.
एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड नको
अनेक लोकांकडे एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड असतात. पण कोणत्याही एकाच बँकेचे क्रेडिट कार्ड वापरण्याचा प्रयत्न करावा. कारण एकच क्रेडिट कार्ड असेल तर अतिरिक्त खर्च टाळता येतो. वेगवेगळ्या क्रेडिट कार्ड्सची प्रोसेसिंग फी जास्त असते. त्यामुळे एकच क्रेडिट कार्ड असेल तर हा वायफळ खर्च टाळता येऊ शकतो.
क्रेडिट कार्डने रोख रक्कम काढू नका
क्रेडिट कार्डच्या मदतीने एटीएममधून कॅश पैसे काढण्याची चूक करू नका कारण अशा प्रकारे पैसे काढल्यास त्यावर भरमसाठ फी आकारली जाते. ज्या दिवशी तुम्ही क्रेडिट कार्डने कॅश पैसे काढता, त्याच दिवसापासून या पैशांवर व्याज चालू होते.
हेही वाचा :
फक्त 210 रुपयांत म्हातारपणी मिळणार 5000 रुपये पेन्शन! सरकारची 'ही' योजना तुम्हाला माहिती आहे का?
FD म्हणजे नेमकं काय? मुदत ठेवीचे 'हे' पाच मोठे फायदे माहिती आहेत का?
पैसे ठेवा तयार! या आठवड्यात येणार तीन मोठे आयपीओ, भरघोस नफ्याची नामी संधी