पैसे ठेवा तयार! या आठवड्यात येणार तीन मोठे आयपीओ, भरघोस नफ्याची नामी संधी
या आठवड्यात एकूण तीन कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून पैसे कमवण्याची नामी संधी आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या कंपन्याचे आयपीओ आले आहेत. यातील बऱ्याच आयपीओंनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिलाय. तर काही वेळा गुंतवणूकदारांचा तोटादेखील झाला आहे. या आठवड्यातही एकूण तीन कंपन्यांचे आयपीओ (IPO) येणार असून, या माध्यमातून पैसे कमवण्याची नामी संधी चालून आली आहे. 6 ते 10 मे या कालावधीत हे तिन्ही आयपीओ येणार आहेत. 2004 सालानंतर पहिल्यांदाच मे महिन्यात प्रायमरी मार्केटमध्ये एकूण 3 आयपीओ येत आहेत. हे तीन आयपीओ नेमके कोणते आहेत? तुम्हाला या आयपीओंत कधी गुंतवणूक करता येईल, हे जाणून घेऊ या..
या तीन कंपन्यांचे आयपीओ येणार
या आठवड्यात आधार हाउसिंग फायनान्स, टीबीओ टेक आणि इंडिजेन या कंपन्यांचे आयपीओ या आठवड्यात येणार आहेत. गुंतवणूकदार या तिन्ही कंपन्यांच्या आयपीओची गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहात होते.
आधार हाऊसिंग फायनान्स
एकूण तीन कंपन्यांपैकी या कंपनीचा आयपीओ सर्वांत मोठा आहे. आयपीओंच्या माध्यमातून ही कंपनी एकूण 3000 कोटी रुपये उभारणार आहे. 8 ते 10 मेपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. या कंपनीच्या आयपीओचा किंमत पट्टा 300 ते 315 रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आला आहे. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर एका वेळी तुम्हाला 47 इक्विटी शेअर खरेदी करावे लागतील. या आयपीओचा ग्रे मार्केट प्रिमियम 65 रुपयांवर होता. आता तो 50 रुपयांपर्यंत आला होता.
इंडीजेन
डिजिटल सर्व्हिस क्षेत्रात काम करणारी इंडिजेन ही कंपनी आयपीओतून 1,841.76 कोटी रुपये उभारणार आहे. 6 ते 8 मे या काळात तुम्हाला या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करता येईल. या आयपीओचा किंमत पट्टा 430 ते 452 रुपये ठरवण्यात आला आहे. या आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला 33 इक्विटी शेअर्सचा लॉट खरेदी कराव लागेल. हा आयपीओ 51 टक्के नफ्यासह शेअर बाजारावर लिस्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टीबीओ टेक
TBO Tek या कंपनीचा आयपीओ येणार असून 8 ते 10 मे या काळात तुम्हाला यात गुंतवणूक करता येणार आहे. ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 1,550.81 कोटी रुपये जमवणार आहे. या कंपनीचा किंमत पट्टा 875 ते 920 रुपये निश्चित करण्यात आलाय. या आयपीओत तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर एका वेळी16 इक्विटी शेअर्स खरेदी करावे लागतील. 40 टक्के नफ्याने या आयपीओची लिस्टिंग होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
शेअर बाजारात पुन्हा हर्षद मेहतासारखा स्कॅम? मोठ्या उद्योजकाच्या दाव्याने खळबळ !
'या' पेनी स्टॉक्सवर ठेवा नजर, गुंतवणूक केल्यास मिळू शकतो चांगला परतावा!
काहीही केलं तरी सीबील स्कोअर वाढत नाहीये? मग फक्त 'या' तीन गोष्टी करा!