Housing News : गृहनिर्माण बाजारासाठी सणासुदीचा हंगाम ठरणार वरदान; चौथ्या तिमाहीत 30% विक्रीची अपेक्षा
Housing Market Demand Growt : गणेशोत्सव ते दिवाळीपर्यंतचा सणासुदीचा काळ गृहनिर्माण बाजारासाठी वरदान ठरणारा असून घरांच्या विक्रीत 30 टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबई : भारतातील गृहनिर्माण क्षेत्राला (Housing Sector) नेहमीच सणासुदीचा हंगाम नवा उत्साह आणि चालना देतो. गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंतचा कालावधी पारंपरिकदृष्ट्या घर खरेदीसाठी शुभ मानला जातो आणि या काळात खरेदीदार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात. यंदाही हाच कल कायम राहणार असून, 2025 च्या चौथ्या तिमाहीत घरांच्या वार्षिक विक्रीत किमान 30 टक्के वाटा असेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
REA इंडिया (Housing.com) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण शर्मा यांनी सांगितले की, 2025 ची पहिली सहामाही तुलनेने संथ राहिली होती. सलग दोन वर्षांच्या दमदार वृद्धीनंतर बाजारात दुरुस्तीचा टप्पा होता. तरीदेखील ऐतिहासिक आकडेवारी दर्शवते की सप्टेंबर ते डिसेंबर हा कालावधी घरांच्या मागणीत नेहमीच सुधारणा घडवतो. त्यामुळेच 2025 ची चौथी तिमाही केवळ मोसमी वाढच घेऊन येणार नाही, तर 2026 पर्यंतच्या गृहनिर्माण क्षेत्राला चालना देणारी ठरेल.
मंदीनंतरचा आशावाद
2025 च्या पहिल्या सहामाहीत रिअल इस्टेट मार्केट काहीसे शांत होते. मात्र, वाढलेला ग्राहक आत्मविश्वास, मध्यम व प्रीमियम सेगमेंटमधील सातत्यपूर्ण मागणी आणि लाइफस्टाइलवर आधारित प्रकल्पांचे वाढते आकर्षण यामुळे खरेदीदारांमध्ये नवा उत्साह दिसून येतो आहे.
विकासकांचे नवे प्रकल्प आणि ऑफर्स
सणासुदीच्या हंगामात विकासक मोठ्या प्रमाणावर नवीन प्रकल्प बाजारात आणत आहेत. आकर्षक सवलती, लवचिक पेमेंट योजना आणि मार्केटिंग मोहिमा यामुळे खरेदीदारांना निर्णय घेणे सोपे होत आहे. या काळात अनेक कुटुंबे त्यांच्या पहिल्या घराच्या खरेदीचा निर्णय घेतात, तर गुंतवणूकदारही दीर्घकालीन नफ्याचा विचार करून रिअल इस्टेटकडे वळतात.
भविष्यातील दृष्टीकोन
विशेष म्हणजे, अगदी आव्हानात्मक काळातसुद्धा चौथ्या तिमाहीने बाजाराला दिलासा दिला आहे. उदाहरणार्थ, 2020 मध्ये कोविडच्या धक्यानंतरही या तिमाहीत तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत तब्बल 32% वाढ झाली होती. त्यामुळेच यंदाही 2025 च्या चौथ्या तिमाहीत बाजारात लक्षणीय सुधारणा होईल आणि 2026 साठी ठोस पाया रचला जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे 2025 च्या अखेरीस गृहनिर्माण बाजार पुन्हा एकदा गतिमान होईल आणि चौथी तिमाही ‘टर्निंग पॉइंट’ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ही बातमी वाचा :
- 'म्हाडा'चे घर घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज; 5285 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; इच्छुकांना आणखी एक संधी























