'म्हाडा'चे घर घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज; 5285 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; इच्छुकांना आणखी एक संधी
म्हाडा कोकण मंडळ सोडत 2025 साठीच्या 5,285 सदनिका आणि 77 भूखंड विक्रीसाठी आयोजित सोडतीकरिता ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 12 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५,२८५ सदनिका व ओरोस (जि. सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीकरिता आयोजित सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला दि. १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत दुसर्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. अनामत रकमेसह प्राप्त पात्र अर्जांची सोडत आता दि. ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी दिली.
सदर सोडतीसाठी २८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०४.०० वाजेपर्यंत १,४९,९४८ अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह १,१६,५८३ अर्ज प्राप्त झाले आहेत. नवीन वेळापत्रकानुसार सदर सोडतीसाठी दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत आहे. दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करता येणार आहे. दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आरटीजीएस/एनईएफटीद्वारे अर्जदारांना बँकेत अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे.
सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी दि. २२ सप्टेंबर, २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता 'म्हाडा'च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ०६ .०० वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी दिनांक ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता 'म्हाडा'च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दिनांक ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण ५६५ सदनिका, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३००२ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत १६७७ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (५० टक्के परवडणार्या सदनिका) ४१ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दि. १५ जुलै २०२५ रोजी 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला. मंडळातर्फे पहिल्यांदा दि. २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करण्यास अर्जदारांना मुदतवाढ देण्यात आली होती. सोडतीसंदर्भात अर्ज भरतांना अर्जदारांना येणार्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी मंडळातर्फे ०२२ - ६९४६८१०० हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. सोडतीसाठी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्जदारांनी अर्ज करावा, असे आवाहन कोकण मंडळातर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात थेट सहभागी होणार ठाकरेंच्या शिवसेनेचा दुसरा खासदार
























