सर्वसामान्यांना पुन्हा झटका! होमलोन महागले, ईएमआयचा बोजाही वाढला
Home loans, EMI : महागाईमुळे त्रासलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक मोठा फटका बसलाय.
Home loans, EMI : महागाईमुळे त्रासलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक मोठा फटका बसलाय. एचडीएफसीसह इतर महत्वाच्या बँकांनी होमलोन आणि ईएमआयमध्ये वाढ केली आहे. आरबीआयच्या मौद्रिक नीती समितीच्या बैठकीआधीच बँकांनी होमलोन आणि ईएमआयमध्ये वाढ केली आहे. पुढील आठवड्यात म्हणजेच सहा ते आठ जून दरम्यान मौद्रिक निती समितीची बैठक पार पडणार आहे. अशात तज्ज्ञांच्या मते, आरबीआय व्याजदर वाढवू शकते. त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा बँका आपल्या व्याजदरात वाढ करु शकतात.
देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसीसह काही बँकांनी आपल्या होमलोनच्या व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली. एचडीएफसीने रिटेल प्राईम लेंडिंग रेटमध्ये (RPLR) पाच बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. महिनाभरातील ती तिसरी वाढ आहे. याचा फटका कर्जदारांना बसणार आहे. एचडीएफसीसह पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि आयसीआयसीआय बँकेनेही एमसीएलआरमध्ये 15 बेसिस पॉईंटने वाढ केली. एसबीआयनेही गृह कर्ज एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिग रेट (EBLR) 40 बेसिस पॉईंटने वाढवलाय. हा रेट आता 7.05 टक्के इतका झाला आहे. तर, आरएलएलआर 6.65 टक्के प्लस सीआरपी असणार आहे. PNB ने सांगितले की नवीन दर लागू झाल्यानंतर, एक वर्षाच्या कर्जावरील MCLR आता 7.40 टक्के झाला आहे, जो आतापर्यंत 7.25 टक्के होता. या बँकेची बहुतांश कर्जे केवळ MCLR वर आधारित आहेत, त्यामुळे त्या कर्जांचे हप्तेही आता वाढणार आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती. त्यामुळे नवीन रेपो दर चार टक्क्यांवरून 4.4 टक्के झाला आहे. रेपो दर वाढल्याने सर्व बँकांनी गृह कर्जाच्या दरात वाढ करणे सुरू केलेय. त्यात आता आरबीआयच्या मौद्रिक नीती समितीच्या बैठकीत रेपो दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते ही वाढ 0.40 टक्के इतकी असू शकते. त्यामुळे भविष्यात बँका पुन्हा एकदा व्याजदरात वाढ करु शकते. मागील काही दिवसांपासून देशात महागाई उच्चांकी पातळीवर पोहचली आहे. त्यातच आता बँकेकडून होमलोन आणि ईएमआयमध्ये वाढ केल्यामुळे सर्वसामान्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.