Affordable Housing Sales Falls : दोन वर्षांत EMI 20 टक्क्यांनी महागला; परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत घट
Affordable House: मागील दोन वर्षांच्या कालावधीत गृहकर्ज आणि कर्जाच्या हप्त्यात वाढ झाली आहे. याचा परिणाम परवडणाऱ्या घरांच्या विक्रीवर झाला आहे.
Affordable Housing Sales Falls: देशातील घरं विक्री होत असली तरी त्यात परवडणाऱ्या घरांच्या विक्रीच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. यंदाच्या 2023 वर्षाच्या पहिल्या सहामाहीत परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत 20 टक्क्यांची घट दिसून आली आहे. महाग होणारे गृह कर्ज आणि कर्जाचा हप्ता ही प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील दोन वर्षात कर्ज 20 टक्क्यांनी महागली आहेत.
परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत घट
मालमत्ता सल्लागार अॅनारॉकने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार, 2023 च्या पहिल्या सहामाहीत एकूण घरांच्या विक्रीत परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत 20 टक्के घट झाली आहे. देशातील टॉप सात शहरांमध्ये 2023 च्या पहिल्या सहामाहीत परवडणाऱ्या विभागातील घरांचा पुरवठा 18 टक्क्यांनी कमी झाला आहे. 2022 च्या पहिल्या सहामाहीत 23 टक्क्यांनी घट झाली.
महागड्या गृहकर्जामुळे सामान्यांची पाठ
महागड्या गृहकर्जांमुळे परवडणारी घरे खरेदी करू इच्छिणाऱ्या गृहखरेदीदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. महागड्या गृहकर्जामुळे गेल्या दोन वर्षांत ईएमआय 20 टक्क्यांनी महाग झाले आहे. 2021 च्या मध्यात 20 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावर 6.7 टक्के व्याजदर होता, जो 2023 मध्ये वाढून 9.15 टक्के झाला आहे.
मुद्दलापेक्षा व्याज अधिक
जुलै 2021 मध्ये, 30 लाखांपर्यंतच्या गृहकर्ज गृह खरेदीदारांना 22,700 रुपयांचा EMI भरावा लागत होता, जो आता वाढून 27,300 रुपये झाला आहे. ईएमआय दरमहा 4600 रुपयांनी महागला आहे. एका वर्षात 55,200 रुपयांपेक्षा अधिक EMI भरावे लागत आहे. 2021 च्या गृहकर्जाच्या दरांनुसार, घर खरेदीदारांना व्याज म्हणून 24.5 लाख रुपये बँकेला द्यावे लागतील. जे आता वाढून 35.5 लाख रुपये झाले आहेत. याचाच अर्थ 11 लाख रुपयांचे अतिरिक्त व्याज भरावे लागत आहे. म्हणजेच घर खरेदी करणाऱ्यांना मूळ रकमेपेक्षा जास्त व्याज द्यावे लागेल. अॅनारॉकच्या मते, हे गृहकर्ज खरेदी करणाऱ्या गृहनिर्माण बाजारासाठी चांगले नाही.
परवडणाऱ्या घरांच्या संख्येत घट
Anarock च्या अहवालानुसार, 2023 च्या पहिल्या सहामाहीत, पहिल्या सात शहरांमध्ये एकूण 2.29 लाख गृहनिर्माण युनिट्स विकल्या गेल्या, त्यापैकी फक्त 46,650 युनिट्स परवडण्यायोग्य होत्या. तर 2022 च्या पहिल्या सहामाहीत 1.84 लाख युनिट्सची विक्री झाली आणि 57,060 म्हणजेच 31 टक्के युनिट्स परवडणाऱ्या घरांची होती.
एक कोटींहून अधिक किंमतीच्या घरांना मागणी
जुलै महिन्यात मुंबईत 10 हजार 200 हून अधिक घरांची विक्री (House Sold) झाली असून यातून राज्य सरकारला 830 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. 'नाईट फ्रँक इंडिया'च्या अहवालानुसार, गेल्या काही वर्षांत 1 कोटी रुपये आणि त्याहून अधिक किमतीच्या घरांच्या नोंदणीच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. एक कोटी किंवा त्याहून अधिक किमतीच्या घरांसाठी नोंदणीचा हा हिस्सा 2020 मध्ये 48 टक्क्यांवरून 2023 मध्ये अंदाजे 57 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.