Gold Rate Today : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात 500 रुपयांची घसरण, जळगावात जीएसटीसह भाव किती?
Gold Rate Today : आज सोन्याच्या दरात पाचशे रुपयांची घसरण झाल्याने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करु पाहणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Gold Rate Today : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडव्याचा (Gudi Padwa 2023) सण जळगावमध्ये (Jalgaon) सोने खरेदीचा मुहूर्त मानला जातो. मात्र सध्या सोन्याच्या दरात (Gold Prices) झालेली उच्चांकी दरवाढ पाहता ग्राहक सोने खरेदीकडे कसा प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागले होतं. परंतु आज सोन्याच्या दरात पाचशे रुपयांची घसरण झाल्याने सोने खरेदी करु पाहणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
जागतिक पातळीवर अमेरिकेतील काही बँक तोट्यात गेल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी बँकेतील पैसा काढून तो सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होऊन त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकाच आठवड्यात सोन्याच्या दरात साडेतीन हजार रुपयांची वाढ झाल्याने सोन्याचे दराने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत 62 हजार रुपयांचा टप्पा गाठला. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या दृष्टीने सोने खरेदी करणं मोठं कठीण झालं आहे.
सोन्याच्या दरात 500 रुपयांची घसरण
अशातच उद्या (22 मार्च) गुढीपाडव्याचा सण असल्याने सोने खरेदीच्या मुहूर्तावर या वाढलेल्या दराचा परिणाम होण्याची शक्यता आहे. जळगावच्या सुवर्ण नगरीत काल (20 मार्च) सोन्याचे दर जीएसटीशिवाय 60 हजार 300 रुपये प्रति तोळा होते, तर जीएसटीसह हेच दर 62 हजार रुपये होते. आज (21 मार्च) यामध्ये पाचशे रुपयांची घसरण होऊन जीएसटीशिवाय सोन्याचा प्रति तोळा दर 59 हजार 700 रुपये तर जीएसटीसह 61 हजार 500 रुपये प्रति तोळा इतका झाला आहेत.
सोने खरेदीला प्रतिसाद मिळेल, विक्रेत्यांना विश्वास
एकीकडे सोन्याचे वाढलेले दर, दुसरीकडे अवकाळी पाऊस, भाव नसल्याने कापसाची विक्री रखडली आहे. मार्च एन्डिंग सुरु आहे आणि सध्या लग्नसराई नसल्याने जळगावच्य सुवर्ण नगरीत सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी पाहायला मिळत आहे. असं असलं तरी उद्याचा गुढीपाडव्याचा सोने खरेदीचा मुहूर्त ग्राहक चुकवणार नाही आणि सोने खरेदीला प्रतिसाद मिळेल, अशी आशा सोने विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
"...तरीही सोने खरेदी करणार"
सोन्याचे दर वाढले असले तरी सोने खरेदीचा मुहूर्त म्हणून आम्ही गुढीपाडव्याला सोने खरेदी करत असतो. सोन्याचे दर वाढल्याने बजेट बिघडले असले तरी सोन्याची खरेदी एक प्रकारची गुंतवणूक असते. त्यात सोने दागिने ही महिलांची हौस असते आणि हौसेला मोल नसल्याने भाव काहीही असले तरी आम्ही सोने खरेदी करत असल्याचं ग्राहकांचं म्हणणे आहे.