अदानी डिसेंबरपर्यंत झारखंडमध्ये 1600 मेगावॅटचा वीज प्रकल्प सुरू करणार; बांगलादेशला वीजपुरवठा करणार
या निर्णयानंतर अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये येत्या काळात चांगली तेजी दिसू शकते असा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे. बांगलादेश हा भारताचा महत्त्वाचा भागीदार
Gautam Adani To Export Power : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना सध्या चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर होत्या. आपल्या दौऱ्यात शेख हसीना यांनी केवळ राजकीय व्यक्तींनाच भेटल्या नाहीत तर भारतातील अनेक मोठ्या उद्योगपतींचीही त्यांनी भेट घेतली. बांगलादेशमध्ये गुंतवणुकीसाठी अशीच एक बैठक शेख हसीना आणि भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यात पार पडली.
ट्रान्समिशन लाइनचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल -
झारखंडमधील गोड्डा पॉवर प्रोजेक्ट अंतर्गत टाकण्यात येत असलेल्या ट्रान्समिशन लाइनचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. यानंतर अदानी समूहाची कंपनी 'अदानी पॉवर' झारखंडमधील गोड्डा येथून बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाला (बीपीडीबी) या ट्रान्समिशन लाइनद्वारे वीजपुरवठा सुरू करेल अशी माहिती या बैठकीनंतर अदानी यांनी दिली.
गौतम अदानींकडून बैठकीचा फोटो ट्विट -
बांगलादेशच्या पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर गौतम अदानी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानांसोबतचा फोटो ट्विट केला. या ट्विटमध्ये अदानी म्हणतात, ''बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना दिल्लीत भेटणे हा सन्मान आहे. बांगलादेशसाठी त्यांची दृष्टी प्रेरणादायी आणि धाडसी आहे. 16 डिसेंबर 2022 रोजी देशाच्या विजय दिनापर्यंत आमचा 1600 मेगावॅटचा गोड्डा पॉवर प्रकल्प आणि बांगलादेशला समर्पित ट्रान्समिशन लाइन सुरू करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.''
It is an honour to have met Hon PM of Bangladesh Sheikh Hasina in Delhi. Her vision for Bangladesh is inspirational and stunningly bold.
— Gautam Adani (@gautam_adani) September 5, 2022
We are committed to commissioning our 1600 MW Godda Power Project and dedicated transmission line to Bangladesh by Bijoy Dibosh, 16 Dec 2022. pic.twitter.com/LySohNBSrV
अदानी पॉवर झारखंडमधील गोड्डामध्ये असलेला 1600 मेगावॅटच्या थर्मल पॉवर प्लांटमधून डिसेंबरपर्यंत बांगलादेशला वीज निर्यात करण्यास सुरुवात करू शकते. बांगलादेशला समर्पित ट्रान्समिशन लाइन 16 डिसेंबर 2022 रोजी देशाच्या विजय दिनानिमित्त कार्यान्वित करण्याची योजना आहे.
अदानी पॉवर शेअर्सवर लक्ष -
गेल्या काही काळात अदानी समूहातल्या शेअर्सची दमदार कामगिरी राहिली आहे. अनेक शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. यावर्षी म्हणजे 2022 मध्ये लार्जकॅप्स 100% पेक्षा जास्त परतावा देणांऱ्यामध्ये अदानी समूहाचे शेअर्स आघाडीवर आहेत. यात अदानी पॉवरने 306% परतावा दिल्याचं आकडेवारी सांगते आहे. त्यामुळे या निर्णयानंतर अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये येत्या काळात चांगली तेजी दिसू शकते असा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे.
बांगलादेश हा भारताचा महत्त्वाचा भागीदार -
बांगलादेश भारताच्या 'नेबरहुड फर्स्ट पॉलिसी'चा महत्त्वाचा भागीदार आहे. दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्य खूप मजबूत आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात व्यापारी, सामरिक, सांस्कृतिक संबंध आहेत. गेल्या पाच वर्षांत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार $9 अब्ज वरून $18 अब्ज झाला आहे.
राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचीही भेट -
शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. राष्ट्रपती भवनात पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी दोघांमध्ये सात करार करण्यात आले. पंतप्रधानांशी झालेल्या भेटीदरम्यान शेख हसीना यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्याचे नायक शेख मुजीबुर रहमान यांच्या ऐतिहासिक भाषणांचे भारतीय भाषांमधील भाषांतर सुपूर्द केले.