Sourav Ganguly : सौरव गांगुलीची आता उद्योगजगतात 'दादागिरी'; बंगालमध्ये सुरू करणार स्टीलचा कारखाना
Sourav Ganguly : माजी कसोटीपटू सौरव गांगुली आता पश्चिम बंगालमध्ये स्टीलचा कारखाना सुरू करणार आहेत.
माद्रिद, स्पेन : भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली याने क्रिकेटच्या मैदानावर आपल्या खेळाने दादागिरी केली. त्यानंतर प्रशासक म्हणून बीसीसीआयवर काम केल्यानंतर आता सौरव नवी इनिंग सुरू करणार आहे. सौरव गांगुली पश्चिम बंगालमध्ये स्टीलचा कारखाना सुरू करणार आहे. एबीपी आनंदासोबत बोलताना सौरव गांगुलीने ही माहिती दिली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या स्पेन आणि दुबईच्या 12 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. सौरव गांगुली या शिष्टमंडळाचा भाग आहे. माद्रिदमधून एबीपी आनंदासोबत खास संवाद साधताना सौरव गांगुलीने सांगितले की, पश्चिम मिदनापूरच्या शालबोनी येथे स्टीलचा कारखाना उभारणार आहे. या प्रकल्पासाठी 2500 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे गांगुलीने सांगितले. पहिल्या टप्प्यात 6000 जणांना रोजगार मिळणार असल्याचे त्याने सांगितले. या कारखान्यासाठी सहा महिन्यांचा वेळ जाणार असल्याचे त्याने स्पष्ट केले.
सौरव गांगुलीने याने या संधीसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचेही आभार मानले आहेत. सौरवने म्हटले की, काही जणांना वाटते की मी फक्त खेळाडू कारकिर्द केले आहे. मात्र, 2007 मध्ये आम्ही एक छोटा स्टीलचा कारखाना सुरू केला होता. आता पुढील पाच ते सहा महिन्यात मिदनापूरमध्ये आणखी एक स्टीलचा कारखान सुरू करणार आहोत.
गुरुवारी माद्रिदमध्ये 'बंगाल ग्लोबल बिझनेस समिट (BGBS)' ला सौरव गांगुलीने संबोधित केले. त्यावेळी सौरवने आपण येत्या एका वर्षात अत्याधुनिक सुविधा पूर्ण करण्यास सक्षम असेल असेही म्हटले.
सौरव गांगुलीने यावेळी त्यांच्या आजोबांनी 50-55 वर्षापूर्वी सुरू केलेल्या कौटुंबिक व्यवसायाचा उल्लेख करत त्यावेळी राज्य सरकारने कसा पाठिंबा दिला, याचाही उल्लेख केला. या राज्याने उर्वरित जगाला नेहमीच व्यवसायासाठी आमंत्रित केले आहे. त्यामुळेच आज मुख्यमंत्री या देशात आहेत. हे स्पष्ट आहे की सरकारला राज्य आणि तरुणांच्या विकासासाठी काम करायचे आहे असेही सौरव गांगुलीने म्हटले.
स्पेनमधील ला लीग क्लबसोबत करार
दरम्यान, पश्चिम बंगालमधील फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्पेन मधील ला लीग सोबत करार केला आहे. ला लीगचे झेव्हियर टेवेज यांच्यासोबत ममता बॅनर्जी यांची बैठक झाली. या बैठकीदरम्यान पश्चिम बंगाल सरकार आणि ला लीगा यांच्यात सामंजस्य करारही करण्यात आला. यादरम्यान, ममता बॅनर्जी, सौरभ गांगुली आणि कोलकाता फुटबॉल प्रमुख मोहन बागान आणि मोहम्मडन यांच्या उपस्थितीत स्पॅनिश फुटबॉल क्लब ला लीगसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. बंगालमधील फुटबॉल खेळाचा आणखी विकास करण्यासाठी, खेळाडू घडवण्यासाठी हा करार असल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले. तर, ला लीगाचे टेवेज यांनी सांगितले की, विविध क्लब आणि राजकीय नेत्यांनी एकमेकांना मदत केली तर फुटबॉलचा विकास होऊ शकतो.