New Financial Rules : आजपासून या नियमांमध्ये बदल; नव्या आर्थिक वर्षात खिशाला झळ
New Financial Rules : 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं आहे. या नवीन वर्षात कोणते नियम बदलले आहेत, हे जाणून घ्या.
New Financial Year 2024-25 : आजपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत असून अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल झाला आहे. नवीन आर्थिक वर्ष लागू झाल्याने आजपासून काही नवे नियमही लागू झाले आहेत. 2024-2025 हे आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू झालं आहे. या नवीन वर्षात कोणते नियम बदलले आहेत, हे जाणून घ्या.
नवीन कर प्रणाली डिफॉल्ट
नवीन आर्थिक वर्षात नवीन कर प्रणाली डीफॉल्ट कर प्रणाली बनली आहे. त्यामुळे टॅक्स रिटर्न भरताना लक्ष द्यावे लागेल. जर तुम्ही आयकर रिटर्न भरताना जुनी कर व्यवस्था निवडली नसेल, तर तुम्ही आपोआप नवीन कर प्रणालीमध्ये याल. या अंतर्गत तुम्हाला आपोआप कर भरावा लागणार आहे. नव्या कर प्रणालीत 7 लाख रुपयापर्यंत करपात्र उत्पन्न असलेल्या लोकांना कोणताही आयकर भरावा लागणार नाही.
एलपीजी सिलेंडर स्वस्त
आजपासून एलपीजी सिलेंडर स्वस्त झाला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत कमी करण्यात आली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 30.50 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. मात्र, 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
केवायसी नसल्यास फास्टॅग बंद
आजपासून केवायसी नसल्यास फास्टॅग काम करणार नाही. जर तुम्ही 31 मार्चपर्यंत फास्टॅग केवायसी अपडेट केलं नसेल तर टोल भरणं कठीण होईल. आजपासून तुमचा फास्टॅग निष्क्रिय होईल.
एनपीएस खाते लॉगिन नियम बदलला
एनपीएस खात्यात लॉगिन करण्याचा नियम आजपासून बदलला आहेत. आता एनपीएस खात्यात लॉगिन करण्यासाठी, तुम्हाला आयडी पासवर्डसह आधारकार्डशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करावा लागेल, त्यानंतरच तुम्हाला लॉगिन करता येईल.
ईपीएफओ खाते हस्तांतरण
एखाद्या कर्मचाऱ्याने नवीन आर्थिक वर्षात नोकरी बदलल्यास, त्याचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) खाते आपोआप नवीन कंपनीकडे हस्तांतरित केले जाईल. आतापर्यंत कर्मचाऱ्यांना खाते हस्तांतरित करण्यासाठी निवेदन द्यावे लागत होते, आता त्याची गरज भासणार नाही.
विमा पॉलिसी नियमात बदल
आजपासून विमा पॉलिसी सरेंडर करण्याचे नियमही बदलले आहेत. आता सरेंडर व्हॅल्यू तुम्ही किती वर्षांनी पॉलिसी सरेंडर केली आहे, यावर अवलंबून असेल.
औषधे महागली
1 एप्रिलपासून अनेक औषधांच्या किमती वाढल्या आहेत. औषध किंमत नियामकाने नॅशनल लिस्ट ऑफ अत्यावश्यक औषधांच्या (NLEM) अंतर्गत पेन किलर, अँटीबायोटिक्स आणि अँटी-इन्फेक्शन औषधे यासारख्या काही आवश्यक औषधांच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर बोजा वाढणार आहे.
SBI च्या ग्राहकांना फटका
SBI डेबिट कार्डचे वार्षिक देखभाल शुल्क आजपासून वाढले आहे, त्यामुळे SBI च्या ग्राहकांना फटका बसणार आहे. याशिवाय, SBI क्रेडिट कार्डद्वारे भाडे पेमेंट केल्यावर मिळणारे रिवॉर्ड पॉइंट देखील आजपासून उपलब्ध होणार नाहीत.