एक्स्प्लोर
Facebook | रिलायन्स जिओमधील 9.99 टक्के भागभांडवल फेसबुक विकत घेणार
रिलायन्सनं मोबाईल टेलिकॉमपासून होम ब्रॉडबॅंडपर्यंत प्रत्येक क्षेत्रात ई-कॉमर्सचा विस्तार केला आहे.तर दुसरीकडे भारतात फेसबुक आणि त्याच्या मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपचं मोठं जाळं आहे.

मुंबई : सोशल मीडिया कंपनी फेसबुकनं (Facebook) भारतातील डिजिटल मार्केटमध्ये आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे. यासाठी फेसबुकनं रिलायन्ससोबत मोठा व्यवहार केला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स जिओ (Reliance Jio) मध्ये फेसबुकनं 5.7 बिलियन म्हणजे 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. बुधवारी फेसबुकनं याबाबत घोषणा केली. एएनआयच्या वृत्तानुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स Jio मध्ये 9.99 टक्के हिस्सा 43, 574 कोटी रुपयांना खरेदी करणार आहे. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर फेसबुक रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक करणारी सर्वात मोठी शेअर होल्डर कंपनी ठरेल. फेसबुकनं याबाबत म्हटलं आहे की, ही गुंतवणूक भारताप्रती आमची वचनबद्धता दर्शवणारी आहे. Jio ने भारतात खूप मोठे बदल घडवले आहेत. त्यामुळे आम्ही देखील आकर्षित झालो. चार वर्षांहून कमी काळात रिलायन्स जिओने 388 मिलियनहून अधिक लोकांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणलं आहे. ही बाब इनोव्हेशन आणि नवीन एंटरप्राइझेसला प्रोत्साहन देणारी आहे. यामुळं जिओच्या माध्यमातून आम्ही भारतात पहिल्यापेक्षा अधिक लोकांशी कनेक्ट करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असं फेसबुकनं म्हटलं आहे. वर्ष 2016 मध्ये जिओचं लॉन्चिंग झालं. रिलायन्स जिओ ही देशातील एकमेव कंपनी आहे जिचा ग्राफ नेहमी उंचावलेला आहे. वेगाने वाढणाऱ्या भारतीय बाजारात अमेरिकन टेक्नीकल समुहांशी प्रतिस्पर्धा करु शकण्यास जिओ सक्षम देखील आहे. रिलायन्सनं मोबाईल टेलिकॉमपासून होम ब्रॉडबॅंडपर्यंत प्रत्येक क्षेत्रात ई-कॉमर्सचा विस्तार केला आहे. तर दुसरीकडे भारतात फेसबुक आणि त्याच्या मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपचं मोठं जाळं आहे. भारतात फेसबुकचे 400 मिलियन यूझर्स आहेत.
आणखी वाचा























