चेक भरताना नेमकी कोणती प्रक्रिया पाळावी, चेक बाऊन्स झाल्यावर काय करावं? जाणून घ्या A टू Z प्रोसेस!
बँकिंगचा व्यवहार आपला आर्थिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. डिजिटल व्यवहार जरी वाढला असला तरी चेकचा वापर अद्यापही महत्त्वाचा आहे. मोठ्या व्यवहारासाठी चेकचा वापर अधिक सुरक्षित आणि सोयीचा मानला जातो.
आजच्या दिवसात प्रत्येक व्यक्तीचे बँकेत खाते असते. बँकेत खाती असलेल्या प्रत्येक व्यक्तीस चेकबुक आणि चेकबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. चेक भरण्याची प्रक्रिया सोपी जरी असली, तरी ती फार काळजीपूर्वक पार पाडावी लागते. चेकने व्यवहार करत असतांना नकळत काही चुका होतात. अश्या वेळेस चेक बाऊन्स होऊ शकतात.
चेकचे एकुण तीन प्रकार आहे
- बिअरर चेक - ज्यामध्ये पैसे चेकधारकाला दिले जातात, कोणतीही ओळख किंवा एंडोर्समेंट असणे आवश्यक नाही.
- ऑर्डर चेक - फक्त चेकवर नमूद केलेल्या व्यक्तीलाच पैसे दिले जातात.
- क्रॉस्ड चेक - पैसे फक्त चेकधारकाच्या बँक खात्यातच वर्ग केले जातात प्रत्यक्ष रोख काढता येत नाही.
चेक भरण्याच्या प्रक्रियेत होणाऱ्या चुकांपासून कसे वाचावे?
चेक भरताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. चेकवर तारीख लिहिणे खूप महत्त्वाचे असते. तारीख नसल्यास चेक वैध मानला जात नाही. तसेच तारीख स्पष्ट आणि वाचण्याजोगी असावी तसेच ती बरोबर असावी. जर चेकवरील तारीख 3 महिन्यांपेक्षा जुनी असेल, तर तो चेक कालबाह्य मानला जातो. चेकवर तारीख लिहिताना नेहमी दिवस, महिना आणि वर्ष स्पष्टपणे DD/MM/YYYY या क्रमने असावे. रक्कम शब्दांत आणि अंकांत लिहिणे आवश्यक असते. चेकवर रक्कम शब्दांत आणि अंकांत बरोबर लिहावी. जर शब्दात आणि अंकांत वेगळेपणा आढळला, तर तो चेक फेटाळला जाऊ शकतो. उदाहरणार्थ अंकांत '1,00,000/-' असेल, तर ते शब्दात 'एक लाख रुपये मात्र' असेच लिहावे. रकमेच्या शेजारी एक स्लॅशचा (/) वापर करावा. असे केल्याने चेकमध्ये फसवणुकीची शक्यता टळते. चेकवर प्राप्तकर्त्याचे नाव व्यवस्थित असावे. चुकीच्या नावामुळे चेक परत येतो. चेकवर आपली स्वाक्षरी योग्य ठिकाणी व बरोबर करावी. चुकीची स्वाक्षरी असल्यास, बँक चेकला अमान्य करू शकते. चेकवर ओव्हररायटिंग टाळावे. ओव्हररायटिंग किंवा दुरुस्ती केल्यास तो चेक संशयास्पद मानला जाऊ शकतो.
चेक बाऊन्स झाल्यास काय करावे?
जर तुमचा चेक बाऊन्स झाला, तर त्याचे कारण बँकेकडून विचारून घ्यावे. चेक बाऊन्स होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. उदा. खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसणे, चेकवरील माहितीतील चूक, चुकीची स्वाक्षरी असणे, चेकचा कालावधी कालबाह्य होणे.
चेक हा बँकिंग व्यवहाराचा एक महत्त्वाचा भाग असतो. चेक भरताना होणाऱ्या चुकांमुळे व्यवहारात अडथळे निर्माण होतात. म्हणूनच चेक लिहिताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. नमूद केलेल्या सर्व टिप्स व सूचनांचे पालन केल्यास चेक बाऊन्स होण्याची शक्यता कमी होते आणि बँक व्यवहार सुगम होतो.
वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.