Cryptocurrency: बिटकॉईन, इथेरियम किंवा NFTला कधीही अधिकृत चलनाचा दर्जा मिळणार नाही, केंद्रीय अर्थ सचिवांचे स्पष्टीकरण
क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक ही लाभदायक असेल याची खात्री नाही, जर नुकसान झालं तर त्याला सरकार जबाबदार नसल्याचं अर्थ सचिवांनी स्पष्ट केलं.
नवी दिल्ली: केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीच्या कमाईवर 30 टक्क्यांचा कर लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतातील क्रिप्टोकरन्सीचा मार्ग मोकळा होणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर आता केंद्रीय अर्थसचिव टी. व्ही. सोमनाथन यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. बिटकॉईन, इथेरियम किंवा एनएफटी यांना भविष्यात कधीही कायदेशीर चलनाचा दर्जा मिळणार नाही, क्रिप्टोला कधीही अधिकृत परवानगी देण्यात येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.
केंद्रीय अर्थसचिव टी. व्ही. सोमनाथम म्हणाले की, बिटकॉईन, इथेरियम किंवा एनएफटी यांना कधीही अधिकृत चलनाचा दर्जा मिळणार नाही. दोन लोकांमधील क्रिप्टोच्या व्यवहारांना क्रिप्टोकरन्सी असेट्स समजले जाईल. तुम्ही सोनं, हिरे किंवा क्रिप्टोची खरेदी करा पण त्याला केंद्र सरकार अधिकृत चलनाची परवानगी देणार नाही.
क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक ही लाभदायक असेल याची खात्री देता येणार नाही असंही अर्थ सचिवांनी स्पष्ट केलं. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर जर नुकसान झालं तर त्याला सरकार जबाबदार नसेल असंही ते म्हणाले.
या वर्षीच्या अर्थसंकल्पात क्रिप्टोकरन्सीच्या कमाईवर 30 टक्क्यांचा कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात गेल्या काही काळापासून क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
संसदेत मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यावेळी बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, "सर्व प्रकारच्या व्हर्च्युअल करन्सीच्या कमाईवर 30 टक्के कर लावण्यात येणार आहे. क्रिप्टोकरन्सी जर कुणाला गिफ्टच्या स्वरुपात मिळाली असेल तर ती स्वीकारणाऱ्याला कर भरावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या :
- Cryptocurrency Tax: क्रिप्टोकरन्सीच्या कमाईवर आता 30 टक्के कर लागणार; अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
- Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सीवर 30 टक्के कर, हे तर क्रिप्टोला मान्यता देण्याकडे एक पाऊल
- Union Budget: डिजिटल करन्सी, टॅक्स स्लॅब, शेती ते व्यापार-उद्योग; अर्थसंकल्प जशाचा तसा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha